पुणे, दि. २७ सप्टेंबर : एका दुर्मीळ आजारामुळे ११ वर्षे त्रस्त असलेल्या आणि त्यामुळेच फुफ्फुस आणि हृदय निकामी झालेल्या एका महिलेवर पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली. ब्रेनडेड झालेल्या महिलेचे हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण करुन ३७वर्षीय महिलेस नवा जन्म प्राप्त झाला आहे.
डॉ. संदीप अट्टावार यांच्या नेतृत्वाखालील डॉ. अनुराग गर्ग, डॉ. आशिष डोळस, डॉ. रणजित पवार, डॉ. प्रभात दत्ता, डॉ. विपुल शर्मा, आणि डॉ. संदीप जुनघरे या टीमने सुमारे आठ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही अवघड कामगिरी पार पाडली. या रुग्णालयात तसेच पुणे परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे.
सिंहगड रोड येथील रहिवाशी व बँक कर्मचारी प्राजक्ता दुगम यांना गेल्या ११ वर्षांपासून फुफ्फुसाचा लिम्फॅन्गिओलिओमायोमॅटोसिस (एलएएम) हा दुर्मीळ समजला जाणारा आजार होता. हा आजार तरुण महिलांना शक्यतो बाळंतपणाच्या काळात होतो. प्राजक्ता यांना आजारामुळे ऑक्सिजन सिलींडर पाठीवर बांधून कामावर जावे लागत होते. तरीही त्यांचे हृदय आणि फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. अशा परिस्थितीत अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता. एका २७ वर्षीय ब्रेन-डेड महिलेच्या नातेवाइकांनी मृत्युनंतर तिचे सर्व अवयव दान करण्यास संमती दिल्यामुळेच प्राजक्ता यांना हृदय आणि फुफ्फुस बसवण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर प्राजक्ता यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
या अत्यंत जटिल शस्त्रक्रियेच्या यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती, डॉ. पी. डी. पाटील, म्हणाले, “स्त्री शक्तीचा जागर असलेल्या नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे. या काळात एका महिलेचे प्राण वाचविण्याची चांगली बातमी सगळ्यांना सांगण्यात मला आनंद होत आहे. ही अवघड व दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आमच्या डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. एकाच वेळी हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी झाल्याने डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वाटचालीत ही ऐतिहासिक घटना आहे. अवयव प्रत्यारोपण आणि हॉस्पिटलचे महत्त्व या शस्त्रक्रियेने अधोरेखित झाले आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये आम्ही समाजातील सर्व घटकांना अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टर व कर्मचारी यांच्या सहयोगाने शक्य तितके सर्वोत्तम उपचार देण्यासाठी समर्पित आहोत.”
हैदराबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांटेशन, केआयएमएस चे प्रोग्राम डायरेक्टर आणि अध्यक्ष डॉ. संदीप अट्टावार म्हणाले, “भारतात ब्रेनडेडनंतर अवयव दानाबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता येत आहे. महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून सार्वजनिक क्षेत्र व मेडिकल कॉलेजशी संलग्न हॉस्पिटलमध्ये अवयव दान करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या क्षेत्रात खाजगी सार्वजनिक भागीदारी आणि तंत्रज्ञान हस्तांतरण ही काळाची गरज आहे. या दिशेने जोर दिल्यास मोठा परिणाम घडवून येईल. यामुळे शैक्षणिक केंद्रे स्वतःला कौशल्य प्राप्त करण्यास सक्षम होतील आणि परवडण्याजोगे खर्च प्रभावी प्रत्यारोपण सामान्य होईल. ब्रेन डेथनंतर अवयव दानासाठी भारतात आता मोठ्या प्रमाणावर जागृती होत आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे एचओडी (कार्डियक सर्जरी) डॉ. अनुराग गर्ग, म्हणाले की अवयव प्रत्यारोपण हे वैद्यकीय क्षेत्रात मोठे आव्हान असते. प्राजक्ता यांना शस्त्रक्रियेसाठी भरती करण्यापूर्वी टीमला प्रचंड तयारी करावी लागली. सर्व साहित्य उपलब्ध करण्यासोबत स्वतःला प्रशिक्षित करुन घ्यावे लागले. आठ तासांच्या शस्त्रक्रियेसाठी हार्ट-लंग मशीन, इंट्रा-अर्टिक बलून पंप, नायट्रिक ऑक्साईड अणि बाय-पीएपी सपोर्ट आवश्यक होते. टीमने शस्त्रक्रियेनंतर प्राजक्ताचे उपचार आणि पुनर्वसन यशस्वी होण्यासाठी अविरत काम केले आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे एचओडी (रेस्पिरेटरी मेडिसिन) डॉ. बर्थवाल, म्हणाले, “शस्त्रक्रियेदरम्यान प्राजक्ताचे श्वासनलिका व फुफ्फुसे स्वच्छ आणि संसर्गमुक्त राहतील याची काळजी घेतली. गेल्या तीन आठवड्यांत आम्ही सात ब्रॉन्कोस्कोपी केल्या आहेत आणि ती पूर्णपणे बरी झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्यावर रात्रंदिवस नजर ठेवली. ”
इंटेंसिव्ह केअर युनिटच्या संचालक डॉ. प्राची साठे, म्हणाल्या, “अतिदक्षता टीमने प्रत्यारोपणापूर्वी ब्रेन-डेड दात्याचे अवयव मूळ स्थितीत ठेवण्याची, तसेच प्राजक्ताला डिस्चार्ज मिळेपर्यंत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवण्याची दुहेरी भूमिका बजावली.”
“माझी अत्यंत अवघड शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या टीमने यशस्वी केली. शस्त्रक्रिया व त्यानंतर तितकीच योग्य काळजी घेण्यात आली. मी आता बरी झाली असून अनुभवी डॉक्टर, सपोर्ट स्टाफ आणि हॉस्पिटलच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मला नवे जीवन मिळाले आहे. मी या सर्वांची आभारी आहे”, अशी भावना प्राजक्ता दुगम यांनी व्यक्त केली.
डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र- कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे आणि डॉ. यशराज पी. पाटील, कोषाध्यक्ष आणि विश्वस्त डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांनी यशस्वी प्रत्यारोपण केल्याबद्दल सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांचे अभिनंदन केले.
एलएएम हा एक दुर्मिळ, सिस्टिक फुफ्फुसाचा आजार आहे, ज्यामुळे फुफ्फुसाचे कार्य हळूहळू कमी होते. हा आजार प्रामुख्याने बाळंतपणाच्या वयातील महिलांना होतो आणि प्रगत एलएएम असलेल्या महिलांसाठी फुफ्फुस प्रत्यारोपण हा एक आवश्यक उपचार पर्याय आहे