पुणे, २१ जून: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योगाचा प्रचार केला आहे. त्यांनी योगाच्या माध्यमातून क्रांती घडविली आहे. योग साधना करून प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात क्रांती घडवू शकतो.” असे विचार खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, तर्फे ८ आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून आयुष मंत्रालय आणि पतांजली योग पीठ यांच्या सहकार्याने कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात योग महोत्सावाचे आयोजन केले. मानवतेसाठी योग ही संकल्पना या वर्षी ठेवण्यात आली होती.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, तेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी योग शिक्षक बापू पाडळकर, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ योगाचे विभागप्रमुख प्रा. निरंजन खैरे व स्कूल ऑफ पीस स्टडीचे अधिष्ठाता प्रा.डॉ.मिलिंद पात्र हे उपस्थित होते.
या प्रसंगी पतंजली योग समिती (पुणे जिल्हा प्रभारी) योग शिक्षक गोविंद गाडगीळ यांनी उपस्थित हजारो विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पतांजली योग प्रशिक्षक यांना योगाचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“योग साधना व ओमकारातून मानवाला शांती मिळू शकते. योग साधनेमुळे तरूणांमध्ये स्वत्व, स्वधर्म आणि स्वाभिमान जागृत करता येते. ७३० वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली यांनी योगाची संकल्पना संपूर्ण मानवजाती समोर मांडली. माऊली हे महान योगी होते. योग महर्षी शेलार मामा यांनी योगाला तळागळापर्यंत पोहचविले. तसेच रामदेव बाबा यांनी संपूर्ण जगभरात योगा पसरविला आहे. चारित्र्य आणि शिस्तीचे पालन केल्यास जीवन समृद्ध होईल.”
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले,“ मानवतेसाठी योगा अत्यंत महत्वाचे तर आहेच पण यामध्ये एकसंघपणा आणि मानवतेचा अर्थ दडलेला आहे. निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे योग आहे. निसर्ग आणि मानवता यातील एक दुवा म्हणजे योगा आहे. भविष्यात वातावरण बदल व बायोडाइर्व्हसिटीचा सामना करण्यासाठी विज्ञान, अध्यात्म व शाश्वत विकास महत्वाचा आहे. त्यातूनच शांती निर्माण होऊ शकते.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.
प्रा. अतुल कुलकर्णी आणि प्रा.पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. निरंजन खैरे यांनी आभार मानले.