पुणे,02 जानेवारी : एकीकडे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते रोज नवीन भविष्यवाणी करत आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘आपण अजितदादांचे फॅन आहोत’, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली.
बारामतीमध्ये खाजगी हॉस्पिटलच्या योजनेच्या शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे एकत्र आले होते. यावेळी बोलत असताना जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.
‘अजितदादांचे काम, दादांचे कर्तृत्व आपल्याला माहीत आहे. दादांची शिस्त मी पहिली आहे, आम्ही राजकीय विरोधक जरी असलो तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी अजितदादांचा फॅन आहे आणि मला हे मला सांगायला काही वाटत नाही. आमचं राजकीय प्रत्येकांचं जमत नाही. पण, दादांचं धाडस, दादांचा स्पष्टोकतीपणा मी पाहिला आहे, असं कौतुकच गोरे यांनी केलं.
तसंच, अजितदादांना जसे हॉस्पिटल हवे होते तसं त्यांनी उभारलं आहे. दत्तात्रय भरणे मामा असल्यामुळे काही प्रश्नच नाही. मी नेहमी मामांसोबत असतो. आम्ही दोघे जवळचे मित्र आहोत, आमदारकीच्या बाबतीत मी सिनियर असलो तरी ते बाकीच्या बाबतीत मला सिनियर आहे, असंही गोरे म्हणाले.
त्यानंतर लगेचच बोलायला उभे राहिलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरेंना पक्षात येण्याची ऑफर देऊन एकच धुरळा उडवून दिली. ‘बारामतीच्या नेत्यानी जर एखाद्याला हात दिला तर दगडात देखील पाणी काढू शकतात. आमच्या दादांचे तुम्ही तोंड भरून कौतुक केलंय. भाऊ तुम्ही हाडाचा कार्यकर्ता आहात. चुकतो तोच माणूस असतो. आमच्या नेत्याचा उल्लेख चांगला केला आहे. तुमच्या डोक्यात चांगला विचार येऊ द्या आणि भविष्यात चांगला विचार भविष्यात करा’ असं म्हणत भरणेंनी जयकुमार गोरेंना राष्ट्रवादीची ऑफर दिली.