मुंबई, 31 मार्च : ‘एसटी महामंडळ विलीनीकरण करता येणार नाही, हे आधीच स्पष्ट झालं आहे. संपकरी कर्मचाऱ्यांकडे आज शेवटचा दिवस आहे. जर कामावर रुजू झाले नाहीतर तर उद्यापासून कडक कारवाई केली जाईल. उद्या जर वेळ मिळाली तर ज्या कर्मचाऱ्यांना बाजूला करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवीन भरती केली जाईल’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून आंदोलनावर ठाम आहे. विलीनीकरण करता येणार नाही, असा समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे असं आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. आज अजित पवार यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे.
‘मी त्यावेळी आपल्याला सांगितले होते, ३१ मार्चपर्यंत मागे ज्या ज्या घटना घडल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासाठी आवाहन केले होते. पण एसटी कर्मचाऱ्यांनी अजूनही संप मागे घेतला नाही. आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून कडक कारवाई केली जाईल. उद्या जर वेळ मिळाली तर ज्या कर्मचाऱ्यांना बाजूला करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवीन भरती केली जाईल’, असा इशाराही अजितदादांनी एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना दिला.
जसे बेस्ट आणि पीएमपीएलने ईलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या आहेत. पंतप्रधानांनी पुण्यात त्याचे लोकार्पण केले आहे. त्यामुळे भविष्यात एसटी महामंडळात त्याचा फायदा होईल. एसटी कर्मचाऱ्यांना १० तारखेला पगार देण्याचे वचन दिले आहे. विलीनीकरण तर होणार नाही, हे समितीच्या अहवालानुसार सांगण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. उद्या जर न्यायालयाने हरकत घेतली तर त्यांचा निर्णय हा सर्वोच्च आहे. पण, कोर्टाने ठरवून दिलेली मुदत संपली तर सरकारला पूर्ण कारवाई करण्याचा अधिकार आहे’ असंही अजित पवार म्हणाले.
तसंच, ‘धार्मिक सण साजरा करण्याबाबतचे निर्बंधावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार आहोत. सोशल डिस्टसिंग ठेवावे, मास्क वापरावे याबद्दल चर्चा आधीच झाली आहे. उद्या १ तारखेपासून निर्बंध आणखी शिथिल होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध मुक्त होणार आहे. आज संध्याकाळी ४ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची बैठक आहे. सगळ्यांशी चर्चा करणार आहे. टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे आणि केंद्राचे काही आदेश आहे का ते तपासून निर्णय घेतला जाईल. आज रात्री गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबद्दल निर्णय जाहीर केला जाईल, असं अजितदादांनी सांगितलं.