पुणे, दि. १२ एप्रिल : ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यालयांना पाठविण्याचे पत्र देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (दि. १२ एप्रिल) करण्यात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात करण्यात आली.
उत्तम किसन धिंदळे (वय-४५) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परमिटरूमच्या लायसन्स प्रक्रियेसाठी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून पोलीस कमिशनर ऑफिस व वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्या कार्यालयांना पाठविण्याचे पत्र देण्यासाठी आरोपी लिपिक उत्तम धिंदळे यांनी पाच हजार रुपये लाच मागितली. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी केली असता उत्तम धिंदळे यास तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक विजयमाल पवार करीत आहेत.
वरील कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.