पुणे 5 मार्च: युवा पिढीने आपल्यातील कौशल्य हे सातत्याने अगदी दररोज अद्ययावत कसे राहील यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे असे मत, भारत फोर्ज लि. च्या सीएसआर हेड लीना देशपांडे यांनी व्यक्त केले. कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा छोटा स्टार्ट अप व्यवसाय सुरु करताना किंवा नोकरी करताना आपल्यातील कौशल्य अद्ययावत ठेवण्याबरोबरच दृष्टिकोनातील सकारात्मकता व नाविन्यता जोपासणेही अत्यंत महत्वाचे आहे असे लीना देशपांडे यांनी आपल्या मनोगतात नमूद करीत प्रत्येकाने आपल्या कामाप्रती उत्कटता बाळगा असे आवाहन केले.तसेच आज आपण नवीन काय शिकलो असा प्रश्न दररोज स्वतःला विचारण्याची सवय अंगी बाळगल्यास यशस्वी होण्यावाचून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही असे लीना देशपांडे यांनी सांगितले.
यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर व हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या
उपायुक्त अनुपमा पवार यांनी विद्यार्थींनींना मार्गदर्शन करताना सांगितले की,ज्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे करिअर यशस्वी करण्याची संधी मिळाली आहे अशा प्रत्येकाने त्याला तिला जमेल तितके किमान एका तरी गरजू व्यक्तीला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी जमेल ती योग्य मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमात कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत तसेच ज्यांना नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या आहेत अशांच्या यशोगाथांचे सादरीकरण व प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थिनींची मनोगते सादर करण्यात आली.
तसेच याप्रसंगी यशस्वी संस्थेमध्ये विविध विभागात कार्यरत असलेल्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर यशस्वी संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनिषा खोमणे, यशस्वी संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट विभागाचे संचालक राजेश नागरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी तर आभार प्रदर्शन संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या केंद्र प्रमुख प्राची राऊत यांनी केले.