मुंबई – शेअर बाजारात पडझड सुरूच आहे, आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. आज शेअर बाजार सुरू होताच आयटी, बँक आणि ऑटो क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअरला मोठा फटका बसल्याचे पहायला मिळाले. दिवसाच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्स तब्बल 482 अकांनी कोसळला. त्यानंतर ही घसरण कायम राहीली असून, सध्या स्थितीत सेन्सेक्समध्ये 748 अकांची घट झाली असून, तो 57,983.95 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 17300 अंकांपेक्षा खाली आली आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजाराला मोठा झटका बसला होता. सेंसक्समध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे तब्बल 8,21,666.7 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी तिसऱ्या सत्रामध्ये सेन्सेक्स 1,624.09 अंकांपेक्षाही खाली आता होता. त्यानंतर चौथ्या सत्रात त्यामध्ये थोड्याप्रमाणात सुधारणा झाली, मात्र घसरण कायम राहिली. मंगळवारी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स 482 अकांनी कोसळला ही घसरण अजूनही सुरूच असून, सध्या सेन्सेक्स 748 अंकाच्या घसरणीसह 57,983.95 अंकांवर पोहोचला आहे. आज देखील गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर मार्केटममध्ये सुरू असलेल्या पडझडीमुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 1,23,474.43 कोटी रुपयांनी कमी होऊन, 2,59,75,055.79 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत लिस्टेड कंपन्यांना तब्बल 9,45,141.13 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.