देशहितासाठी एकात्मिक कार्य उभारण्याची गरज* – श्री श्री रविशंकर यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२२’ प्रदान
Views: 683
0 0

Share with:


Read Time:6 Minute, 9 Second

पुणे : “भारत हा ऋषी व कृषीचा देश आहे. आपल्या देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी, पृथ्वीला सुंदर स्वर्ग बनविण्यासाठी प्रत्येक भारतीयाला ईश्वराने ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो. ऋषी व कृषीने आपल्याला एकत्र बांधून ठेवण्याचा संस्कार दिला आहे. हाच संस्कार जपत देशहितासाठी एकात्मिक कार्य उभारण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांनी केले.

पुण्यातील सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिला जाणारा द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया – ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२२’ देऊन श्री श्री रविशंकर यांना सन्मानित करण्यात आले. बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमात आयोजित किसान समृद्धी महोत्सवात हा पुरस्कार कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रसंगी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते.

श्री श्री रविशंकरजी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन विधेयके आणली होती. मात्र, काही लोकांनी स्वार्थापोटी ही विधेयके मागे घेण्यास भाग पाडले. आपण त्यातील तथ्य समजून घ्यायला हवे. जलस्रोत, भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यावर आपण भर दिला पाहिजे. दिवा जळत नाही, तर त्यातील तेल आणि वात जळते, हे लक्षात घेऊन आपण प्रत्येकाने प्रकाशमय काम करण्याचा प्रयत्न करावा. भारताची कृषी व्यवस्था सर्वोच्च स्थानावर पोहोचण्यासाठी माझे योगदान देणार, असा मनात संकल्प करा.”

गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, “कृषी व जल व्यवस्थापन क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चांगले काम होत आहे. मात्र, तिसरे महायुद्ध झाले, तर पाण्यावरून होईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञ मांडतात. त्यामुळे पाण्याचे संकट आपल्यावर ओढवू नये, यासाठी आपण प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. आपला देश भौगोलिक विविधतेत असल्याने प्रत्येक भागातील परिस्थिती वेगळी आहे. वातावरणातील बदल, वाढते तापमान याबाबत वैज्ञानिकही चिंतेत आहेत. आपला देश भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. भूगर्भातील जलस्रोत वाढवण्याचे काम आपल्याला करावे लागेल. नद्या जीवित ठेवायच्या असतील, तर आपल्या जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करावी लागतील. नदी पुनर्जीवित अभियानामुळे शेती समृद्ध होऊ लागली आहे, ही समाधानाची बाब आहे.”

आचार्य लोकेश मुनीजी म्हणाले, “भारतीय शेतकरी एकत्रितपणे काम करताहेत, हे पाहून आनंद वाटतो. अठ्ठेचाळीस नद्यांचे पुनर्जीवन करून शेतकऱ्यांना, सामान्यांना पाणीदार करणाऱ्या श्री श्री रविशंकर यांचे कार्य आदर्शवत आहे. निःस्वार्थ भावनेने समाजाची, अध्यात्माची सेवा करण्याचे कार्य करणारे एक विद्यापीठ आहे. समाजसेवा, शांती, अहिंसा, सद्भावनेचे काम त्यांनी केले. पाणी, जमीन, मानवता, पर्यावरण रक्षणासाठी नक्षलवाद, दहशतवाद मुक्तीसाठी प्रवृत्त करण्याचे काम रविशंकर यांनी केले आहे.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “जगभर शांततेचा, प्रेमाचा संदेश देत समाजमन घडवणाऱ्या श्री श्री रविशंकरजी यांना हा पुरस्कार प्रदान करताना आमचाच सन्मान वाढला आहे. ज्यांच्या मुखात सरस्वती नांदतेय, अशा गुरुजींचा आधुनिक भारताचे संत म्हणून गौरव करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. प्रेम, करुणा, माया यातून रविशंकरजी यांनी जगभर शांततेचा, अहिंसेचा प्रसार केला आहे.”

थावरचंद गेहलोत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत श्री श्री रविशंकरजी, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्याचा गौरव केला. रविशंकरजी शांतिदूत म्हणून जगभर कार्य करत आहेत. साधना, सेवा आणि सत्संग यामुळे लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येत आहेत. कृषी व जलसंधारणाच्या क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?