
पुणे, 5 ऑगस्ट : पुणे शहरात सध्या मेट्रो रेल्वेच्या (Pune Metro Rail) कामांनी चांगलीच गती घेतली आहे. मेट्रो रेल्वेचं काम शहरामध्ये सुरू असतानाच या कामावर आरोप देखील होत आहेत. पुण्यातील मेट्रो रेल्वे विभागानं थेट डीपी रस्ता (DP Road) गायब केला आहे. या प्रकरणाचा पत्ता आयुक्त, बांधकाम विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, स्थानिक भाजपा नगरसेवक आणि आमदार यांना याचा कोणताही पत्ता नाही,’ असा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षानं केला आहे.
काय आहे प्रकरण?
आम आदमी पक्षाच्या शंकर थोरात यांनी हे आरोप केले आहेत. या प्रकरणात आपण जून महिन्यापासून महानगरपालिका, मेट्रो आणि शेतकी महाविद्यालय यांच्याशी पत्र व्यवहार केल्याचा त्यांचा दावा आहे. शिवाजीनगर वाकडेवाडी येथे साखर संकुल , जवळून हा रस्ता नियोजित आहे. हा रस्ता वाकडेवाडी येथून रेल्वे मार्गाला समांतर खडकी येथपर्यंत व तेथून सिंचन विभागाकडे प्रस्तावित आहे. या रस्त्यामुळे मेट्रो प्रवासी, रेल्वे प्रवासी व स्थानिक रहदारी ही जुन्या महामार्गावर न जाता या समांतर रस्त्याने होईल.
मेट्रो रेल कॉर्पोरेशननं थेट या रस्त्यावर अतिक्रमण करीत येथे रूळ टाकून ही जागा ताब्यात घेतल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. ‘या रस्त्यामुळे रेल्वे आणि मेट्रोसाठी सर्विस रोड स्वरूपाचा या रस्त्याचा उपयोग होणार होता. आता हा रस्ताच बंद झाल्याने पुढील काळात वाहतुकीवर परिणाम होऊन कोंडी होणार आहे. याबाबत आपण मेट्रो रेल्वेचे कार्यकारी संचालक गाडगीळ यांना याची पूर्ण माहिती यापूर्वीच दिली आहे.’ असे थोरात यांनी स्पष्ट केले.
गाडगीळ यांनी याबाबत अनेक दिवस चालढकल केली त्यामुळे आपचे शंकर थोरात , शिवाजीनगर चे अध्यक्ष सतीश यादव आणि आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून याबाबत तातडीने पाऊले उचलण्याबाबत निवेदन दिले आहे.
या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मालमत्ता विभागाने ही जागा ताब्यात घेण्याची आवश्यकता असताना प्रशासन व मेट्रो अधिकारी गाडगीळ , मेट्रो साईट डेपो इन्चार्ज ब्रिजेश भट्टाचार्य हेही तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. मात्र आम आदमी पार्टी याबाबत गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.