पुणे,दि.३ मे: “ भितीमय व युध्दजन्य वातावरणात विश्वशांती व मानवतेचा संदेश डॉ. विश्वनाथ कराड देत आहेत. जगात सर्व देशांचे वेगवेगळे झेंडे आहेत. परंतू माणुसकीचा झेंडा मात्र डॉ.कराड यांच्या हदयात तेवत आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांचे भोंगे मात्र स्वार्थापोटी वाजतांना दिसत आहे. तर डॉ. कराड हे वसुधैव कुटुम्बकम आणि विश्वकल्याणाचा भोंगा वाजवितांना दिसत आहेत.” असे मत ज्येष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा लिखित ‘विश्वशांती की खोज में : विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड’या हिंदी ग्रंथाचा प्रकाशन एमआयटीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी विशेष सन्माननीय पाहुणे होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्र कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये व विश्वशांती केंद्राचे सल्लागार डॉ. एस.एन.पठाण हे उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,“ संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या कार्यांचा आदर्श घेऊन ते सतत शांतीसाठी कार्य करीत आहेत. या पुस्तकातील विचार राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचविणे गरजेचे असून इंग्रजी भाषेत अनुवाद व्हावा. शांततेचे वातारवण निर्मितीसाठी डॉ. कराड यांनी रामेश्वर रुई येथे राम रहिम सेतू, बुद्ध विहार, आळंदीत घाटांची उभारणी व जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाची निर्मिती केली. ब्रदिनाथ येथे श्री. सरस्वती मंदिराची उभारणी करुन संपूर्ण मानवजातीला एकत्रित आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे.”
अनुराग त्रिपाठी म्हणाले,“ हा ग्रंथ समाजाला आदर्श दाखवून देण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्राला संंतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांनी जीवन संघर्ष शिकविला. संघर्षातूनच व्यक्तीमत्व मोठे होते. यांचे उत्तम उदाहरण डॉ. विश्वनाथ कराड आहेत. विचारांनी व्यक्तिमत्व घडते तीच व्यक्ति सर्व धर्म समभावाचा संदेश देऊ शकतो. डॉ. कराडांनी वसूधैव कुटुम्बकमचा संदेश दिला आहे.”
डॉ. रतनलाल सोनाग्रा म्हणाले,“ जगाला दिशा दाखविणारे सर्व महान व्यक्ति आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊली-संत तुकाराम महाराज यांच्या नावांने जगातील सर्वात मोठा विश्वशांती घुमट साकारणारे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या विश्वात्मक तत्त्वाचे दर्शन या ग्रंथात घडते. सर्व धर्म समभावाचा संदेश व ५४ पुतळ्यांचे काव्यमय लेखन यामध्ये रचले गेले आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७०० व्या समाधी सोहळ्या निमित्त पहिल्या जागतिक तत्वज्ञान परिषदेत विश्वशांतीच्या शोधामध्ये पुस्तक प्रकाशित झाले होते. त्या क्षणापासून भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचे स्वरूप जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वामी विवेकांनदांनी भाकीत केल्याप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, शांती आणि समाधान नांदेल हा उद्देश ठेऊन कार्य करत आहे. आता समाजामध्ये हळूहळू परिवर्तन होतांना दिसत आहे.”
डॉ. संजय उपाध्ये आणि डॉ.एस.एन.पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व स्वागत पर भाषण केले. डॉ. महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. आरती सोनाग्रा यांनी आभार मानले.