उद्योग जगतातील नेतृत्वाने मराठवाड्यात शंभर देवराया निर्माण कराव्यात – माहिती संचालक गणेश रामदासी
Views: 128
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 53 Second

पुणे, दि.१८: मानवी जीवनासाठी वृक्षाचे महत्व लक्षात घेऊन सयाजी शिंदे यांनी लातूर जिल्ह्यात संजीवनी बेट येथे निर्माण केलेल्या देवराईच्या धर्तीवर उद्योग जगतातील व्यक्तींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यात शंभर देवराई निर्माण करण्याची मुहूर्तमेढ रोवावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनायालयाचे संचालक गणेश रामदासी यांनी केले.

बालगंधर्व मंदीर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाडा समन्वय समितीच्यावतीने आयोजित मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अभिनेता सयाजी शिंदे, समन्वयक समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, सचिव दत्ताजी मेहेत्रे आदी उपस्थित होते.

मराठवाडा समन्वय समितीने प्रशासकीय सेवेत केलेल्या कार्याची दखल घेवून पुरस्कासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करून श्री. रामदासी म्हणाले, दिल्लीत कार्यरत असतांना दिल्लीतील महाराष्ट्राचा परिचय, तेथील विविध क्षेत्रात कार्यरत माणसांची माहिती नागरिकांना होण्यासाठी संकलनात्मक माहिती पुस्तकांचे संपादन केले होते. दिल्लीत महाराष्ट्राचे जसे प्रतिनिधित्व दिसते तसे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने पुण्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे प्रतिबिंब दिसून येते. प्रत्येक जिल्ह्याची संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती, साहित्य आदी वैशिष्टपूर्ण माहिती याठिकाणी मिळते. मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होत असताना १०० देवराया निर्माण झालेल्या असतील.

श्री. रामदासी पुढे म्हणाले, पुण्यात मराठवाड्यातील लोक कष्टाची भाकरी शोधत असतात.मराठवाड्यातील सुशिक्षित तरुणाला रोजगार मिळण्यासाठी तसेच उद्योग क्षेत्रात लागणारे कुशल, प्रशिक्षित कामगार उपलब्ध होण्यासाठी मराठवाडा समन्वय समितीने एक ॲप तयार करावे असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा स्थानिक पातळीवर निपटारा करुन त्यांना सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्यात १७ सप्टेंबर पासून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यामध्ये सेवा, कर्तव्य आणि साधना संकल्पनेवर भर देण्यात आलेला आहे. त्यामधील सेवा खूप महत्वाची बाब आहे. त्यामुळे मनामध्ये मदत करण्याची भावना असल्यास ती सेवेत परावर्तीत होऊन कर्तव्याचा भाग बनते. परंतु त्यासाठी साधना आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी आगामी २०२३ हे वर्ष जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा या सारख्या पौष्टिक तृणधान्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळणार आहे. त्यामुळे व्यक्तीने आपल्या आहारात भाकरी, तृणधान्य समावेश करावा. यामाध्यमातून प्रत्येकांनी आपण आपल्या मातीशी प्रमाणिक राहून शेतकऱ्याला आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे श्री. रामदासी म्हणाले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?