पुणे : आठव्या जागतिक योग दिनानिमित्त (दि. २१ जून) सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘ताल आरोग्यम योगथॉन २०२२’चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सलग तीन तास सुमारे ३०० कर्मचारी व ३००० विद्यार्थी व असोसिएट्स यांनी संकुलामध्ये, तसेच ऑनलाईन तबल्याच्या, संगीताच्या तालावर योग केला. शिवाय या तीन तासापलीकडे अजून एक तास सूर्यनमस्कार घालून अखंडपणे हा योग साधणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना व पाच कर्मचाऱ्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाय मानवता आणि सर्वांगीण विकासासाठी शरीर आणि मनाचा समतोल साधणाऱ्या या अनोख्या ‘ताल आरोग्यम योगथॉन’ची विश्वविक्रमी नोंद करण्यात आली आहे.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या योगथॉनला सुरुवात झाली. संगीताच्या तालावर सर्वाधिक वेळ, सर्वाधिक लोकांनी योग करण्याचा विक्रम स्थापित करण्यात आला. सुमारे ३०० शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ३००० विद्यार्थी यामध्ये प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. शालेय ते पीएचडीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, असोसिएट्स यांचा यावेळी समावेश होता. बन्सीरत्न सभागृह, सुर्यभवन, सरस्वती भवन, धन्वंतरी भवन, श्रीगणेश भवन या पाच सभागृहात लाईव्ह एलईडी टीव्हीच्या माध्यमातून ही योगासने झाली.
यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहाय्यक उपाध्यक्ष स्नेहल नवलखा यांनी देखील सर्वांसोबत पूर्णवेळ योग प्रात्यक्षिके केली. योग आणि स्वास्थ्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी वेळोवेळी या प्रत्यक्ष योग्य करणाऱ्या प्रत्येकाकडे जातीने लक्ष देत होते. कोण दमले आहे, नाडीचे ठोके या सर्वांकडे जातीने लक्ष दिले जात असून हा उपक्रम ऐच्छिक असून कोणीही स्वतःवर जबरदस्ती करू नये, अशा सूचना वेळोवेळी दिल्या जात होत्या. ज्येष्ठ तबला वादक अमित चौबे आणि गायक व हार्मोनियम वादक जयंतसिंग चौहान यांच्या संगीताने सहभागींना एक वेगळीच ऊर्जा दिली. यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा चोरडिया, स्नेहल नवलखा, योग प्रशिक्षिका सोनाली सासर, सविता गांधी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
ताल आरोग्यम योगथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात आले. पहिल्या पाच विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार असे रोख बक्षिस देण्यात आले. यात विद्यार्थ्यांमध्ये वृषांक चौधरी, प्रज्वल भरम, ओमकार राऊत, मुस्सह शेख, आदेश ढेंगरे यांनी तर शिक्षकांमध्ये कोमल धोका, उल्हास चौधरी, मारुती मारेकरी, शुभम लोंढे, सोनाली बिसन यांनी सुमारे चार-साडे चार तास सलग योगासने करून पहिली पाच पारितोषिके पटकाविली. या कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक्समध्ये होणार आहे. एकूण ३८ वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स पैकी ३२ संस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, त्यातील ४ संस्थांमध्ये याची विश्वविक्रम म्हणून नोंद झाली आहे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
यावेळी तबला व हार्मोनियमच्या साथीने तालाच्या बोलांबरोबरच लेझीम ताल, गणपती ढोल ताल, कोळी गीताचा ताल, धनगर गीत, हम होंगे कामयाब अशा गीतांवरही तालबद्ध योगासने सादर झाली. यावेळी प्राणायाम, वॉर्मअप, सूर्यनमस्कार, योगासने असे विविध व्यायामप्रकार करत ‘तालआरोग्यम’ साधण्यात आले. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा चोरडिया, स्नेहल नवलखा यांच्या नेतृत्वात हा उपक्रम आयोजिला होता.
याविषयी बोलताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आज येथे सलग चार तासाहून अधिक काळ सामूहिकरीत्या योग करण्यात आला. एरवी अनेक कारणे सुचतात. पण एकदा मनापासून ठरवले की आपण काहीही करू शकतो, याचा अनुभव देणारा हा कार्यक्रम ठरला. हा अनुभव मुलांच्या आयुष्यभर लक्षात राहील. हे ज्ञान पुस्तकी नसून प्रात्यक्षिकातून मिळालेले असल्याने यातून मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. जागतिक योग दिवस अर्धा पाऊण तास योग करून साध्य होत नाही. त्यामुळेच यादिवशी नेहमीपेक्षा काहीतरी अधिक व वेगळे करावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजिला होता. त्याला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मिळून यशस्वी केला याचा मला खूप आनंद व अभिमान आहे. येथे सलग तीन तास किंवा त्याहिपेक्षा अधिक वेळ योगासने करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे अशी सलग योगासने करणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन करतो.”