चिंचवडमध्ये डॉ. सलील कुलकर्णी यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान
पुणे: आपल्या मुलांच्या यशाचे कौतुक होताना आईच्या डोळ्यात जे भाव असतात त्याने जे समाधान मिळते ते कशानेही मिळत नाही. आईचे आणि मुलाचे नाते हे सूर्य आणि पृथ्वी प्रमाणे असते असे प्रतिपादन ज्येष्ठ कलावंत डॉ. मोहन आगाशे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान व सिध्दीविनायक ग्रुपच्या वतीने पार्श्वगायक डॉ. सलील कुलकर्णी यांना आशा भोसले पुरस्कार रविवारी चिंचवड येथे प्रदान करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, डॉ. सलील कुलकर्णी, सलील कुलकर्णी यांच्या मातोश्री, राष्ट्रपती पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र, सिने अभिनेत्री ब्रिंदा पारेख, तळेगाव नाट्य परिषद शाखा अध्यक्ष सुरेश धोत्रे, किरण हर्षवर्धन भोईर, माजी नगरसेविका गीता मंचरकर तसेच राजू बंग, किरण येवलेकर, नरेंद्र आमले, सुहास जोशी, प्रकाश
जगताप, बाळ जुवाटकर, गौरी लोंढे, संजीवनी पांडे, संतोष पाटील, संतोष शिंदे, संतोष रासने, जयराज काळे, कीर्ति मटंगे, सल्लागार विजय जोशी, हेमेंद्रभाई शहा, राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोहन अगाशे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, गो. नी. दांडेकर यांनी जैत रे जैत मधील चिंधी ची भूमिका आशा भोसले यांना डोळ्यापुढे ठेवून लिहीली होती. हे पुस्तक आशा भोसले यांना समर्पित आहे. या चित्रपटात मी नाग्याची भूमिका केली आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे. आज सलील कुलकर्णी यांनी मातृदिनाच्या दिवशी पुरस्कार स्विकारत असताना त्यांनी त्यांच्या आईला देखील सोबत घेतले आहे. सगळीकडे राजकारण असताना भाऊसाहेब भोईर यांनी मराठी नाट्य परिषदेच्या या रंगमंचावर कधीही राजकारण केले नाही, हे भाऊसाहेब यांचे कलाक्षेत्र विषयी आदर असण्याचे प्रतिक आहे. भाऊसाहेबांनी कलाकारांचे स्वातंत्र्य, मान, सन्मान नेहमीच जपला आहे. यामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील योगदान आहे.
सहकाऱ्यांचे देखील योगदान आहे. अशा शब्दात डॉ. मोहन आगाशे यांनी पिंपरी चिंचवड नाट्यपरिषदेचे कौतुक करीत सावनी रविंद्र आणि सिनेअभिनेत्री ब्रिंदा पारेख यांना आशिर्वाद दिले.
स्वागत, प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, यापूर्वीच्या प्रत्येक पुरस्कार वितरण सोहळ्यात बाळासाहेब उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे हे पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे सदस्य झाले त्यानंतर ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष देखील झाले. आज त्यांच्याच हस्ते डॉ. सलील कुलकर्णी यांचा सत्कार करताना शहराला अभिमान वाटत आहे. डॉ. मोहन आगाशे यांनी माणसातील माणूसपण जपले आहे. त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. डॉ. सलील कुलकर्णी यांनी देखील संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे अभंग, बालगीतांपासून पासून ॲटम सॉंग पर्यंत त्यांनी अनेक रचना सादर केल्या आहेत. तरूणाईच्या मनामध्ये काव्य फुलविण्याचे काम डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले आहे. ज्येष्ठ लोकनेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते २५ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. या पुरस्काराचे हे १९ वे वर्ष होते. या निवड समितीमध्ये ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, राजेशकुमार साकला यांचा समावेश आहे असेही भोईर म्हणाले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले की, लतादीदी
संगीत क्षेत्रातील सूर्य आहेत, तर आशाताई संगीत क्षेत्राच्या आकाशातील चांदणं आहेत. मला मिळालेला पुरस्कार मोरया गोसावींचा आशिर्वाद आहे तो मी माझ्या आईला समर्पित करतो. 2013 साली माझं गाणं दीदींनी गायले हे स्वप्नवत होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून खूप शिकता आले. कविता निवडणे, त्याला चाली लावणे, त्यांच्यावर बोलणे, लोकांपर्यंत पोहोचवणे हे सर्व मला मंगेशकर यांच्या कडून शिकता आले हे मी देवाची कृपा समजतो. आशा भोसले हे एवढं मोठं नाव की संगीतातल्या माणसांचे मंगेशकर हे कुलदैवत आहे.
स्वागत प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर, सूत्रसंचालन आकाश थिटे व आभार सुहास जोशी यांनी मानले.
Read Time:6 Minute, 39 Second