पुणे: आंबेगाव तालुक्यातील उगलेवाडी या छोट्याशा गावामध्ये विठ्ठल रुख्मिणी मंदीरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामध्ये उगलेवाडी आणि परिसरातील अनेक महिला भगिनी व भाविक भक्त उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने उगलेवाडी गावातून परगावी सासरी गेलेल्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या सर्व महिलांनी मिळून ‘सुकन्या ग्रुप’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या माहेरच्या गावच्या विकासासाठी सामाजिक व आर्थिक स्वरूपात नियमितपणे मदत करत असतात.
या महिला भगिनींच्या सहकार्याने विठ्ठल रुख्मिनी मंदीराच्या रंगकामासाठी जवळपास १ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या सुकन्या ग्रुपच्या संकल्पनेतूनच ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमांतर्गत उपस्थित महिलांचे वृक्षारोपणाचे महत्त्व, कापडी पिशव्यांचा वापर तसेच जागतिक तापमानवाढीच्या समस्येबाबत प्रबोधन करण्यात आले.
अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मंदीर परिसरान काल्याच्या किर्तनाचे किर्तनकार ह.भ.प गजानन महाराज जंगले व उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. तसेच उपस्थित सर्व महिला भगिनींनी आपापल्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. एक आदर्शवन उपक्रम म्हणून या उपक्रमाची परिसरात चर्चा झाली. या कार्यक्रम प्रसंगी माजी जि.प. सदस्या जनाबाई उगले, सरपंच मीनाबाई उगले, सुकन्या महिला ग्रुपच्या प्रवर्तक, युवा उद्योजिका सिताबाई किरवे, सविता सुपे, शांताबाई उगले, विश्वनाथ उगले, रामचंद्र उगले, रामदास उगले, रघुनाथ उगले सबाराम डगळे, सुदाम उगले, पुणेकर, मुंबईकर मान्यवर व भाविक भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय उगले यांनी केले.