नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार पिंपरी-चिंचवडकरांना आंद्राचे पाणी; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची संयुक्त प्रकल्प पाहणी
Views: 154
0 0

Share with:


Read Time:6 Minute, 31 Second

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिचंवडमधील पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी हाती घेतला आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन नोहेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी शहरवासीयांना करावी लागलेली प्रतीक्षा आता संपली आहे.
चिखली येथे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी सोमवारी करण्यात आली. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवांन्ना गट्टुवार, गोंडवाना इंजिनिअर्स लिमिटेड ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच, आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून उचलण्यात येणऱ्या २६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत ८ हेक्टर परिसरात उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दोन लाईन जोडायच्या राहिल्या आहेत. त्याचे काम ८ दिवसांतच होईल. येत्या १५ दिवसांत पाणी सोडण्याची चाचणी होईल. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

 

आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या २० दिवसांतत निघोजेतून पहिल्या टप्प्यात 50 एमएलडी पाणी उचलले जाईल. त्यातून समाविष्ट गावाला पाणीपुरवठा केला जाईल. या भागाचे अतिरिक्तचे पाणी चिंचवडमधील वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेगुरव, रावेत या गृहनिर्माण सोसायट्या असलेल्या भागाला दिले जाईल. त्यामुळे शहरातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे मत श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात निघोजेतून ५० एमएलडी पाणी उचलले जाईल. पुढील तीन महिन्यात आणखी ५० एमएलडी पाणी उचलण्यात येईल. त्यातून समाविष्ट भागातील तळवडे, चिखली, मोशी, निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी डुडुळगाव, चहोली, दिघी या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. या भागाला पाणी मिळाल्याने शहराच्या उर्वरित भागाला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पाण्याच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचे समाधान वाटते, असे आमदार महेशदादा लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या २७ लाखांच्या घरांत आहे. त्यामुळे पवना धरणाव्यतिरिक्त अन्य जलस्त्रोत निर्माण करणे काळाची गरज होती. त्यादृष्टीने भाजपाच्या काळात आंद्रा व भामा आसखेड प्रकल्प हाती घेण्यात आला. कोविडमुळे दीड-दोन वर्षे प्रकल्पाचे काम संथ गतीने झाले. मात्र, आता लवकरच पिंपरी-चिंचवडकर नागरिकांना आंद्रा धरणातून पाणी मिळणार आहे. आज चिखलीतील प्रकल्पाची पाहणी केली. शहरातील पाणी पुरवठ्यावरील ताण कमी होणार असून, समाविष्ट गावांतील नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.
– शंकर जगताप,
निवडणूक प्रभारी, चिंचवड विधानसभा.

*****
भाजपा- बाळासाहेबांची शिवसेना एकवटली…
पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांच्या मुद्यांवर भारतीय जनता पार्टी आणि बाळसाहेबांची शिवसेना (शिंदे गट) एकवटली आहे. चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाहणीसाठी शिंदे गटाचे अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप असे तीनही नेते एकत्र आले होते. तसेच, महापालिका प्रशासनावर नियंत्रण करुन प्रशासकीय कारभाराला गती दिल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित विकासकामे मार्गी लावून शहरवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?