Read Time:5 Minute, 10 Second
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागाअंतर्गत संगीत अकादमी निगडी आयोजित शास्त्रीय संगीत, तबला, होशियम, व सुगम संगीत या विषयावरील प्रत्येकी १ दिवसाची कार्यशाळा दि. २६ ते २९ एप्रिल, 2022 अखेर संपन्न झाली.
या कार्यशाळेअंतर्गत 29 एप्रिल ला पं. राजेश दातार यांची सुगम संगीत या विषयावरील कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. याची सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी श्री. पं. राजेश दातार यांचा सत्कार शाह, श्रीफळ, बुके, व पुस्तक भेट देऊन सहाय्यक आयुक्त (क्रीडा) सुषमा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पं. राजेश दातार यांनी गातांना आपली पट्टी कशी ओळखावी, आवाजाची क्षमता सक्षम कशी करावी, आवाजाची रेंज कशी वाढवावी, आवाजाची पोत – बेसिक, शार्प पातळ असेल तरी रिवाज व संस्कारांनी कसा तयार होतो, हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. शास्त्रीय संगीत, सुत्रम, नाटय संगीत, उपशास्त्रीय यापैकी आपली आवड कशी करावी? याविषयी योग्य मार्गदर्शन केले.
१२ सुरातून आनंद कसा मिळवावा? आवाजाचे फिरकी स्वर कसे लावावेत? भक्ती, फोक संगीत कसे गायला हवेत? सुर, ताल यांचे महत्व, माईक टेक्निक, सुगम, शब्दोच्चाराचे गायनातील महत्व, गाण्यातील नजाकत, ताल, लय यातील फरक, मिंड, ज्ञान व मुरकीचा अभ्यास, सूर स्थिर कसा करावा? याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे गीते सादर केली. गीतातील गोडवा, माधुर्व, शांतता, ॐकाराचा अभ्यास, आवाजाला गोलाई कशी प्राप्त करावी? तसेच स्वरयंत्राचा वापर, जिभेचा वापर, व्हालविंग, स्वरयंत्र स्वरतंतू भक्कम कसे करावेत याचे मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात समीर सूर्यवंशी यांनी प्रश्नोत्तराचा तास आयोजित केला होता. विद्यार्थ्याच्या प्रश्नांना पं. राजेश दातार यांनी समर्पक उत्तरे दिली.
यावेळी सहाय्यक आयुक्त (क्रीडा) सुषमा शिंदेयांनी सांगितले की, या कार्यशाळेमध्ये चारशेहून अधिक संगीत प्रेमी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संगीत जोपासणे व संवर्धन करणे, जास्तीत जास्त कलाकार घडवणे व त्यांना प्रोत्साहन देऊन व्यासपीठ निर्माण करून देणे, शास्त्रीय संगीताचे दर्जेदार शिक्षण देणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे ध्येय आहे. जिथे सामाजिक विकास झालेला आहे सुसंस्कृतपणा आहे अशाच ठिकाणी संगीताला आश्रय मिळतो, संगीताचा विकास होतो. कलागुणांना वाव देणे हेच प्रगतशील समाजाचे लक्षण आहे. यापुढेही नाविन्यपूर्ण उपक्रम संगीतप्रेमींसाठी विद्यार्थ्यांसाठी राबवले जातील. यापूर्वी अकादमीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे गायक-वादक तयार झालेले आहेत.
याप्रसंगी अनिता केदारी, क्रीडाधिकारी तसेच सहायक आयुक्त(क्रीडा) सुषमा शिंदे यांनीही गीते गाऊन आपल्या कलेचे सादरीकरण केले तसेच संगीत शिक्षक वैजयंती सदाफुले यांनीही गीताचे सादरीकरण केले.
यावेळी क्रीडापर्यवेक्षक अशोक पटेकर, वैजयंती भालेराव- सदाफुले नंदिन सरीन, उमेश पुरोहित, संतोष साळवे, मिलींद दलाल, वैशाली जाधव, स्मिता देशमुख हे उपस्थित होते.
पं. राजेश दातार यांना तबला साथ विनोद सुतार यांनी दिली. निवेदन समीर सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनीष जगताप, शंतनू कांबळे, राजेश थावरिया, सुभाष घुटुकडे, रविंद्र कांबळे यांनी परिश्रम घेतले.