पिंपरी चिंचवड : दि. ०३ मार्च: पिंपरी चिंचवड मधील मोहननगर प्रवेशद्वार ते मेहता हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतर महापालिकेने रस्त्याच्या दर्जाची तांत्रिक तपासणी केली. त्यात रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले. अखेरीस ठेकेदाराला ८ लाखा ३ हजार ५६७ रुपयांचा दंड ठोठविण्यात आला आहे.
माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी गुरुवारी( दि. ३) पत्रकार परिषद घेत रस्ता काँक्रीटीकरण कामातील अनियमिततेचे पुरावेच सादर केले. मारुती भापकर म्हणाले पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोहननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमान ते मेहता हॉस्पिटल दरम्यान विकास आराखड्यातील १ कि.मी. रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी १४ कोटी ८५ लाख ८४ हजार रुपयांचे कंत्राट मे. इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी देण्यात आले. या कामाची मुदत २४ महिने म्हणजे १६ जुलै २०२१ रोजी संपुष्टात आली. मात्र मुदत संपुनही अजुनही रस्त्याचे काम सुरु आहे. या दिरंगाईमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. किरकोळ अपघाता बरोबरच वाहतुक कोंडी ध्वनी वायु प्रदुषण वीज व पाणी पुरवठा खंडीत होणे, वीज वाहिन्या तुटणे यामुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले याबाबत वारंवार तक्रार करुनही त्यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही.
अखेरीस ३० ऑगस्ट २०२१ रोजी सिमेंट काँक्रीटच्या या रस्ते कामातील अनियमितता दर्जाबाबत ९ मुद्यांची लेखी तक्रार आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गाऱ्हाणे मांडण्यात आले. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी दक्षता व नियंत्रण कक्षाकडे तक्रारीची खातरजमा करण्यास सांगितले. वारंवार पाठपुराव्यामुळे दक्षता व नियंत्रण कक्ष अधिकारी, कार्यकारी अभियंता, प्रकल्प सल्लागार, ठेकेदार प्रतिनिधी आणि गुणवत्ता नियंत्रण प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली तथापि या ठेकेदाराला वाचवण्यासाठी हे सर्वजण संगणमत करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत आयुक्तांकडे पुन्हा दाद मागण्यात आली. आयुक्तांच्या आदेशानुसार १३ डिसेंबर २१ रोजी पुन्हा स्थळ पाहणी केली. त्यावेळी तक्रार म्हणून सर्व तांत्रिक त्रुटी दोष मी त्यांना दाखवून दिले. त्याचे छायाचित्रण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले तसेच एक स्थळ पाहणी अहवाल तयार करून संबंधितांची स्वाक्षरी घेण्यात आल्या. त्यामुळे यातील काही वस्तुस्थिती दक्षता व नियंत्रण समितीला समोर ठेवावीच लागली. दक्षता व नियंत्रण कक्षाने आपल्या शिफारशी अ प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्याला कळविल्या. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी ८ लाख ३ हजार ५६७ रुपये ठेकेदार याच्या बिलातून वसूल करण्याचे आदेश दिले. यामध्ये पी क्यू सी ३०० एम एम जाडी हवी असताना ती २०० एमएम काही ठिकाणी मिळून आली. काही ठिकाणी २७०एमएम तर काही ठिकाणी २८० एमएम मिळून आली. पी एल सी व जी एस बी मध्ये देखील त्रुटी आहेत. महापालिकेने केलेली ही कारवाई फुसकी असून धुळफेक करणारी आहे. ही कारवाई किरकोळ स्वरूपाचे असून ठेकेदाराला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. आपण केलेल्या तक्रारीतील ९ मुद्द्यांपैकी केवळ एकाच मुद्द्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. तथापि या कारवाई बाबत मी बिलकुल समाधानी नाही. काँक्रीट करण्याच्या कामात गुणवत्ता ढासळली असून या प्रकरणाची मा. आयुक्त यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली तटस्थ तज्ञ अधिकाऱ्यांची समिती नेमून सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी भापकर यांनी केली आहे
Read Time:5 Minute, 48 Second
… [Trackback]
[…] Read More on on that Topic: marathi.reportertodaynews.com/pimpri-chinchwad-municipal-corporation-imposes-rs-8-lakh-fine-on-contractor-for-substandard-road-concreting-work-success-in-the-pursuit-of-maruti-bhapkar/ […]