रामदास तांबे
पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८०व्या जन्मोत्सवानिमित्त पुणे शहरात सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीला शहरातील जनतेचा उदंड प्रतिसाद मिळला. या दिंडीत 5 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. पुणे शहर अक्षरशः भगवेमय झाले होते. एक वेगळाच उत्साह सर्वांमध्ये संचारला होता.
भिकारदास मारुती मंदिर येथून शंखनाद, धर्मध्वजाचे पूजन आणि पालखी पूजन करून या दिंडीला प्रारंभ झाला. पुढे शनिपार चौक – लक्ष्मी रस्ता – अलका टॉकीज चौक – लकडी पूल मार्गे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे दिंडीची सांगता झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, वारकरी संप्रदाय, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चिंतामणी प्रासादिक दिंडी क्रमांक ३०, श्री योग वेदांत सेवा समिती, केडगाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, थेऊर, सासवड, सोरतापवाडी येथील ग्रामस्थ, कोलवडी येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ पथक आणि ज्योत, संत सोपानदेव समाधी मंदिराचे सेवेकरी, बालसंस्कार वर्ग वानवडी यांच्यासह अन्य अनेक समविचारी संघटनांचे कार्यकर्ते या दिंडीत बहुसंख्येने सहभागी झाले होते.
नऊवारी साडी परिधान केलेल्या रणरागिणी, पारंपारिक वेशात सहभागी झालेले कार्यकर्ते, क्रांतिकारकांच्या वेशातील बालसाधक, स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके हे या दिंडीचे वैशिष्ट्य ठरले. चौकाचौकांत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भवानीमाता यांची प्रतिमा असलेल्या पालख्यांचेही अनेकांनी दर्शन घेतले. शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता,अलका टॉकीज चौक आदी ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी सांगता सभेत सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे म्हणाले की, ‘जेव्हा ही सकल हिंदुशक्ती एकत्रित दिसेल, जेहा ही बहुसंख्य हिंदूंची एकता आविष्कृत होईल आणि तिची व्रजमूठ तुम्हाला दिसेल, त्या क्षणी हे हिंदु राष्ट्र होऊन जाईल.एकापेक्षा अधिक हिंदू जेव्हा एकत्रित होतात, तेव्हा विश्वकल्याणाचे कार्य करतात, हा इतिहास आहे. त्यामुळे आपल्या एकत्र येण्याने आणि रहाण्याने शुभकल्याण होईल, याची निश्चिती बाळगा !’
परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वतः संमोहन उपचारतज्ञ असून विज्ञानाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर त्यांनी अध्यात्ममार्गावर प्रवास चालू केला. संत भक्तराज महाराज हे त्यांना गुरू म्हणून लाभले. गुरूंच्या आशीर्वादाने त्यांनी अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. सत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मशिक्षणवर्ग, ग्रंथलेखन आदी माध्यमातून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू असतानाच त्यांनी राष्ट्ररक्षण,धर्मजागृती आणि समाजसाहाय्य या त्रिसूत्रीच्या आधारेही कार्य आरंभले. पुढे कालानुरूप धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. कलियुगात जलद अध्यात्मिक उन्नती करून देणार्या ’गुरुकृपायोग’ या योगमार्गाची त्यांनी निर्मिती केली आणि व्यष्टीसाधने सह समष्टी साधनेचाही पुरस्कार केला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक जण साधना करत आहेत आणि राष्ट्ररक्षण, तसेच धर्मजागृतीच्या कार्यात सहभागी होत आहेत. सनातन वैदिक हिंदु धर्म, राष्ट्र यांना पूर्नप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नरत रहाणे, हीच त्यांच्याप्रतीखरी कृतज्ञता ठरेल. त्याच भावनेपोटी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.