मुंबई, 14 फेब्रुवारी: मागील काही काळात देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलीविरोधात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. रस्त्यावरून जाता येता महिलांना विविध प्रकाराच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अल्पवयीन मुली तर शाळेत देखील सुरक्षित नाहीयेत, शिक्षकाकडून विनयभंग आणि अत्याचाराची अनेक प्रकरणं यापूर्वी समोर आली आहेत. पण प्रत्येक स्पर्श हा वाईट नसतो, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण बोरिवली येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टानं नोंदवलं आहे. तसेच विनयभंगाच्या गुन्ह्यातील क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका केली आहे.
हा निकाल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट ए आर माळवदे यांनी दिला आहे. हा निकाल देताना माळवदे यांनी म्हटलं की, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यामध्ये केसाइतकं अंतर आहे. त्यामुळे केवळ स्पर्श केल्याच्या कारणातून कुणाविरोधात विनयभंगाचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही, असंही न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.
त्याचबरोबर आरोपीनं वाईट हेतूने पीडितेला स्पर्श केल्याचे ठोस पुरावे न्यायालयात जोपर्यंत सादर केले जात नाहीत. तोपर्यंत संबंधित स्पर्शाला असभ्य भावनेनं केलेला हल्ला म्हणता येणार नाही. किंवा तक्रारदार मुलगी वा महिलेच्या विनयशीलतेचा अपमान झाला असंही म्हटलं जाऊ शकत नाही, असं महत्त्वपूर्ण निकाल यावेळी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने सुनावला आहे. दोन्ही पक्षाकडील वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची क्रीडा शिक्षकाची निर्दोष मुक्तता केली आहे.
पीडित मुलगी मुंबईतील एका शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकते. तर आरोपी हा संबंधित शाळेत क्रीडा शिक्षक (शारीरिक प्रशिक्षण) म्हणून कार्यरत आहे. दरम्यान प्रशिक्षण घेत असताना 41 वर्षीय क्रीडा शिक्षकाने वाईट हेतूने स्पर्श केल्याचा आरोप पीडित मुलीने केला होता. या प्रकरणी क्रीडा शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर बोरिवली येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टानं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, आरोपी क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका केली आहे.