अभियंते हो तुमच्यासाठी…!!☺
(सैनिका नंतर जे लोकं आपला देश आणि देशवासीय सुरक्षित आणि अग्रेसर राहण्यासाठी अपार मेहनत घेत असतात त्यांना अभियंते म्हणतात )
–अभियंता म्हटलं तर अनेकांना नाही कळणार पण इंजिनियर म्हटलं की रस्ते, बांधकाम किंवा पुल उभारणीसाठी नकाशा रेखाटणारी एक विशिष्ट छबी आपल्या समोर उभी राहते, मात्र अभियंते केवळ रस्ते आणि पुलच उभारतात असं नाहीय तर जगाच्या स्पर्धेत चालणाऱ्या देशाचं सारथ्य करत असतात, उद्याचं भविष्य बघू शकणारी ही लोकं त्यानुसार समाज घडविणारे सदैव शिक्षक आहेत पण पडद्या मागचे…
हिंजवडी IT पार्क मध्ये नेहमी जावं लागतं त्या निमित्ताने अनेक अभियंत्या तरुण तरुणींच्या ओळखी झालेल्या, त्यांच्याशी कधीही बोललं की त्यांच्या बौद्धिक संपदेचा हेवा वाटतो, आपल्या देशात बसून बाहेरील देशातील अनेक बड्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या तांत्रिक बाबी चुटकीसरशी सोडविणारे हे अभियंते खऱ्या अर्थाने अभ्यासू म्हणायला हवं मात्र IT अभियंत्या ह्या जातीच्या सगळ्यांना आपण सगळ्यांनी केवळ गलेलठ्ठ पैसा पगार कमवून अय्याशी करणारी so called बिघडे देशभक्त ह्या चौकटीत भरून ठेवलंय, ते जे ढिगाने पैसे कमवतात तो तर त्यांचा अधिकारच आहे, त्यामुळे त्या पैश्यावर कसं जगावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र ते कमवतात, जगतात म्हणून त्यांच्या कामाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही..
एक IT अभियंता, जेवढा पगार कमावतो त्याच्या दहा पट गुंतवणूक करवुन घेतात,
आपण मोबाईल वापरतो त्यातील Apps चा उपयोग करतो किंवा जेवढे काही इलेक्ट्रॉनिक वस्तु, गॅजेट, वाहन जे काही वापरतो त्या सगळ्यांचं सॉफ्टवेअर ही मंडळी बनवतात, विचार करा हे वापरत असतांना जेवढा वेळ आपण घालवतो त्यापेक्षा अधिक काळ ही मंडळी ते उपकरण किंवा सॉफ्टवेअर update – upgrade करण्यासाठी घालवतात असं असून देखील ह्या सगळ्यांची मेहनत केवळ पैश्यात मोजली जाते हे खरं दुर्दैव..
मिसाईल मॅन – डॉ APJ अब्दुल कलाम,
मेट्रो मॅन – इ श्रीधरण, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन, प्रख्यात राजकीय व्यक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गुगलचे CEO सुंदर पिचाई, रिलायन्स ग्रुपचे मुकेश अंबानी, मायक्रोसॉफ्ट ग्रुपचे सत्या नडेला ही किंवा जगाच्या पाठीवर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेले अभियंते हे भारतीयच आहेत. ह्याचा अभिमान वाटतो मात्र खेद याचाही आहे की देशात 10 लाखांपेक्षा जास्त अभियंते दरवर्षी बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नोकरी नाही, सरकारी कामकाजाचं स्वरूप बदललय पण अजूनही जुनेच अभियंते जुन्याच पद्धतीने काम करत असल्याने सरकारी विभागाच्या कामाचा वेग प्रचंड मंदावलाय, ज्याचा परिणाम देशाच्या विकासावर होतोय.
अभियंता किंवा इंजिनियर म्हणताना ह्या तरुणांना अभिमान तर वाटतो मात्र जेव्हा अशा अभियंत्यांना भजे तळून पोट भरण्याचा सल्ला दिला जातो त्या पेक्षा मोठा अपमान आणखी कुठला असूच शकत नाही.
आज अभियंता दिवस साजरा करत असताना किंवा साजरा करायचा म्हणून आपलं जीवन गतिमान बनविणाऱ्या ह्या सर्व अदृश्य हातांना त्यांच्या कार्याला कर्तुत्वाला सलाम करूया शक्य असल्यास भेटून, तसं शक्य नसेल तर आपल्या मुलांना कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची ओळख करून देताना हे गॅजेट तुझ्यासारख्याच माणसाने बनवलयं आणि त्याला अभियंता किंवा इंजिनियर म्हणतात असं सांगा बस्स…
आज अभियंता दिना निमित्त सर्व अभियंत्यानां मनःपूर्वक शुभेच्छा 🌹
-गोविंद अ . वि.वाकडे