दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत आहे. त्यामुळं भारत सरकारनं ‘ब्रँड इंडिया ॲट ग्लोबल स्टेज’ यावर लक्ष केंद्रित करुन देशभरातील 75 राष्ट्रीय स्तरावरच्या प्रतिष्ठित ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची योजना आखली आहे. प्रतिष्ठित ठिकाणांवर योग प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, पंचायत राज मंत्रालयानं पंतप्रधानांकडून आलेले पत्र देखील सर्व सरपंचांना पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी योग दिन साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह हे 21 जून 2022 रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार या शहरात वसलेल्या हर की पौडी येथे 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील हे जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील जगप्रसिद्ध निसर्गरम्य दाल सरोवराच्या काठावरील शेर- ए- काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्यासोबत जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा हे सुद्धा या सोहळ्यात सामील होणार आहेत. या प्रतिष्ठित मान्यवरांव्यतिरिक्त, श्रीनगर येथील कार्यक्रमात पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती देखील असणार आहे.