
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ थोड्याच दिवसात संपणार आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर पुढील उपराष्ट्रपती कोण असेल याच्या चर्चा सुरु होत्या. भाजपप्रणित रालोआकडून जगदीप धनखड (Jagdeep Dhankar)आणि विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीकडून मार्गारेट अल्वा (Margaret Alva ) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, रालोआच्या जगदीप धनखड यांनी मार्गारेट अल्वा यांना पराभूत केलं आहे.
भाजपचे लोकसभा आणि राज्यसभा असं मिळून ३९४ खासदार आहेत. याशिवाय जदयू, अण्णा द्रमुक, लोकजनशक्ती पार्टी, एकनाथ शिंदे समर्थक खासदार, बीजेडी, वायएसआर काँग्रेस, बसपा, अकाली दल, टीडीपी यांचा पाठिंबा असल्यानं जगदीप धनखड यांचं पारडं जड मानलं जात होतं. कागदावर जगदीप धनखड यांना ५२७ खासदारांची मतं मिळणार असल्याचं दिसून येत होतं. एकूण ७२५ खासदारांनी मतदान केलं. ७१० मतं वैध ठरली तर १५ मतं अवैध ठरली. जगदीप धनखड यांना ५२८ मतं मिळाली तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली.
५५ खासदारांची मतदानाला दांडी
उपराष्ट्रपती निवडणुकीत टीएमसीनं तटस्थ राहण्याचा निर्धार केला होता. टीएमसीच्या ३४ खासदारांनी मतदान केलं नाही. भाजपच्या २, समाजवादी पार्टीचे दोन आणि शिवसेना आणि बसपाच्या एका खासदारानं मतदान केलं नाही. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं. शिशिर अधिकारी आणि दिब्येंदू अधिकारी मतदान केलं आहे.
जगदीप धनखड हे मूळचे राज्यस्थानमधील आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभं राहण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. जगदीप धनखड यांच्या राजस्थानातील झुंझुनूमधील किठाणा गावात गावकऱ्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. स्थानिक लोकगीतांच्या गायनासह जल्लोष करण्यात येत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपाठोपाठ उपराष्ट्रपती निवडणुकीत देखील भाजपप्रणित रालोआनं मोठं यश मिळवलं आहे.