पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय पुणे यांचेमार्फत दि.०५ मे ते १० मे, २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड, पुणे येथे आयोजित आंबा महोत्सवाचे उदघाटन गुरुवार दि.०५/०५/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता महोत्सवात सहभागी झालेले आंबा उत्पादक शेतकरी श्री. जयंत आग्रे मु.करगुडे ता. जि. रत्नागिरी व रेवती लिमये मु.पो. केळशी ता. दापोली जि. रत्नागिरी यांच्या हस्ते आंबा महोत्सवाच्या स्टॉलची फीत कापून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी राजेंद्र महाजन उपसरव्यवस्थापक विभागीय कार्यालय, पुणे तथा उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, शेखर कोंडे सहा. व्यवस्थापक श्री. दयानंद उर्फ बाळासाहेब देशमुख सहा. व्यवस्थापक, श्री. अनंत सावरकर वरिष्ठ डेटा एन्ट्री ऑपरेटर, श्री. आदित्य माने, कृषी व्यवसाय पणन तज्ञ, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हातील आंबा उत्पादक शेतकरी व पिंपरी चिंचवड शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय पुणे यांचेमार्फत दि.०५ मे ते १० मे, २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड, पुणे येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या आंबा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये २० स्टॉलची उभारणी करण्यात आली. महोत्सवाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ आहे.
या महोत्सवामध्ये कोकणचा राजा अर्थात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्तम, दर्जेदार, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या हापुस आंब्याच्या खरेदीची सुवर्णसंधी पुणे व पिंपरी -चिंचवड भागातील ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. उत्पादक ते ग्राहक या योजने अंतर्गत सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे ग्राहकांना कमी दरात आंबा उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ अशा प्रकारचे महोत्सवाचे आयोजन मागील २० वर्षापासुन करित आहे.
सदर आंबा महोत्सवाचा पुणे व पिंपरी-चिंचवड येथील ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा.ना.श्री. बाळासाहेब पाटील (मंत्री, सहकार व पणन, महाराष्ट्र राज्य), मा. ना. श्री. शंभुराज देसाई (राज्यमंत्री, पणन), मा. सुनिल पवार (कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ), मा. दिपक शिंदे (सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ) व मा. श्री. राजेंद्र महाजन (उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय पुणे) यांनी केले आहे.