मुंबई, 08 फेब्रुवारी : कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं देण्यात येत आहे. त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थी विरोध करत आहेत. तर राज्य सरकारनंही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये बारावीची परीक्षा होणार आहे. म्हणूनच स्टेट बोर्डातर्फे बारावी परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात याव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र यानंतरही राज्य सरकारनं बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येणार असं ठामपणे सांगितलं होतं. यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार मार्च – एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा तर एप्रिल – मेमध्ये दहावीची परीक्षा होणार आहे. यातील बारावीच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट उद्या उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
राज्य शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक कढून राज्यातील सर्व महाविद्यालयांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना या प्रवेशपत्रांबाबत सूचित करण्यात आलं आहे. दिनांक 9 फेब्रुवारी 2022 ला दुपारी 1.00 वाजता पासून बारावीच्या विद्यार्थ्यांना आपले हॉल तिकीट बोर्डाच्या ऑफिशिअल वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहेत. हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीटाची प्रिंट काढून द्यायची आहे अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क घेण्यात येऊ नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. या हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का मारून घेणं आवश्यक असणार आहे. जर विद्यार्थ्यांच्या नावात किंवा इतर कोणत्याही माहितीमध्ये चूक आढळून आली तर यासंबंधित मदत महाविद्यालयांनी करायची आहे. विद्यार्थ्यांचा फोटो चुकीचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्यावर अचूक फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापकांची सही घेणं आवश्यक आहे.