देवाला काळजी; मग सरकार कशाला?’ पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन ‘सामना’तून टोले आणि सल्ले!
Views: 212
0 0

Share with:


Read Time:13 Minute, 20 Second

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  सुरक्षेबाबत पंजाबमध्ये  घडलेल्या प्रकारावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही निवळताना दिसत नाहीय. यावरुन सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना आज शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात या विषयावर भाष्य केलं आहे. या लेखातून पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी काळजी व्यक्त केली आहेच मात्र काही दाखले देत टोले देखील लगावले आहेत.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, देशाचे नेतृत्व करणाऱ्या अनेकांना कधी ना कधी धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागलेच आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबतीत पंजाबात जे घडले ते चिंताजनक, तितकेच धक्कादायक आहे. देवाच्या कृपेने मोदी सुखरूप परत आले म्हणून देवांचे आभार. तरीही पंजाबातील सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. आम्ही तर म्हणतो, विषय देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीचा असल्यामुळे संयुक्त संसदीय समिती स्थापन करून या प्रकाराची चौकशी व्हायला हवी. म्हणजे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. पुलवामा ते पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा चिंतेचाच विषय आहे. आम्ही मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य चिंतितो, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

 

लेखात म्हटलं आहे की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणावरून देशात गोंधळाचे, तितकेच गमतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी, कार्यकर्त्यांनी जागोजागी पूजाअर्चा, महामृत्युंजय जप, यज्ञ, महाआरत्यांचे आयोजन सुरू केले आहे. लोकांनी घरात व बाहेर धूप, आरत्या वगैरे करून पंतप्रधानांच्या सुरक्षित दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. मोदी यांना सुरक्षित जीवन लाभावे यासाठी उत्तर प्रदेश, आसामचे मुख्यमंत्री मंदिरात पूजेला बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. एकंदरीत संपूर्ण देशच अशा पद्धतीने ईश्वरपूजेत मग्न झाल्याने आपण सगळेच अध्यात्माच्या शेवटच्या बिंदूला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व कशासाठी, तर पंजाबात पंतप्रधान मोदी यांच्या जिवावरच बेतले होते, पण देवाच्या कृपेने ते वाचले म्हणून. मोदी यांच्याभोवती असलेले अभेद्य सुरक्षा कवच, प्रशिक्षित एसपीजी कमांडो, प्रचंड सुरक्षा दल, अत्याधुनिक बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाडय़ा-घोडे यामुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले व पंजाबातून सुखरूप दिल्लीस परत आले. त्यामुळे नवीन वर्षात त्यांच्या सुरक्षेवरून देवदिवाळी सुरू केली आहे, पण मुळात घडले काय, घडले कसे व जे घडले त्यास जबाबदार कोण याचा थांगपत्ता लागणे आवश्यक आहे, असं लेखात म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की,  पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या बाबतीत साप समजून भुई धोपटणे हा प्रकार योग्य नाही व त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील फटी व चिरा कधीच बुजवता येणार नाहीत. पंतप्रधान मोदी दोन दिवसांपूर्वी पंजाबमधील फिरोजपूर येथे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी आले, पण त्यांचा ताफा रस्त्यावरील उड्डाणपुलावर शेतकऱयांच्या एका गटाने अडवल्याने मोदी अचानक दौरा सोडून माघारी परतले हे उपकथानक समोर आले आहे. उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा पंधरा-वीस मिनिटे थांबला. निदर्शकांनी रस्ता रोखल्यामुळे हे घडले असे सांगितले गेले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत या त्रुटी आहेत असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. या विषयावर आता भलतेच राजकारण सुरू झाले आहे व त्यात देवादिकांनाही ओढण्यात आले आहे. आपल्या पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. जगातील दहा सर्वोच्च नेत्यांच्या तोडीची सुरक्षा व्यवस्था पंतप्रधान मोदी यांना लाभली आहे. सुरक्षेसाठी एसपीजी कमांडोंचे कवच आहेच, पण नुकतीच 12 कोटींची मेबॅक-बुलेटप्रूफ गाडीही त्यांच्या ताफ्यात सामील झाली आहे. त्यामुळे आपल्या पंतप्रधानांचा बालही बाका होणार नाही, असं लेखात म्हटलं आहे.
हे सत्य असले तरी पंतप्रधानांचा ताफा रस्त्यावर अडवणे, आंदोलकांनी रस्ता रोखणे याचे समर्थन कोणी करू नये. पंजाबातला शेतकरी दीड वर्षापासून तीन कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करीत होता व शेवटी पंतप्रधानांना माघार घ्यावी लागली. तरी शेतकऱ्यांचे प्रश्न संपलेले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न लोकशाही मार्गाने मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे व पंजाबसारख्या राज्यात हे स्वातंत्र्य जरा जास्त आहे. पंतप्रधान येणार म्हणून आपल्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी जिल्हा तसेच तहसील कार्यालयांवर आंदोलने करून निवेदने देणार होते. प्रत्यक्ष पंतप्रधानांचा रस्ता अडवून गोंधळ घालण्याची कोणतीच योजना नव्हती. जे घडले त्यामागे दुसरेच कोणीतरी काम करीत आहे असे आता संयुक्त किसान मोर्चातर्फे सांगण्यात आले. सखोल आणि निष्पक्ष चौकशी करा अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. पंजाबात काँग्रेसची राजवट आहे. कॅ. अमरिंदर यांच्यावर भरवसा दाखवून भाजपने त्यांच्याशी युती केली व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असे वचन कॅ. अमरिंदर यांना दिले. तरीही शेतकऱयांनी पंजाबात पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन केले. त्यामुळे कॅ. अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
लेखात म्हटलं आहे की, फिरोजपूरला पंतप्रधानांची जाहीर सभा होती. सभेसाठी किमान पाच लाख शेतकरी जमतील असे ढोल वाजविण्यात आले. पाच हजार बसेसची व्यवस्था माणसे जमविण्यासाठी करण्यात आली, पण फिरोजपूरचे सभास्थान मोकळेच राहिले. हीसुद्धा देवाचीच कृपा म्हणायची काय? प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. कोणी आणायचा प्रयत्न केला तर मग हल्ले आणि प्रतिहल्ल्यांची तयारी ठेवायला हवी. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी ते ज्या राज्यात जातात त्या राज्याचीच असू शकते. पण केंद्र सरकारचीही एक जबाबदारी असतेच. या घटनेची गंभीर दखल पंजाबच्या सरकारने घेतली व फिरोजपूरच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्यात आले, पण केंद्रीय स्तरावर अशी कारवाई कोणावर झाली काय? फिरोजपूरच्या रस्त्यावर आंदोलक येऊ शकतात, याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागास नसावी याचे आश्चर्य वाटते. पाकिस्तान, अमेरिका, युरोपातील अंतर्गत घटनांची खबर आमच्या गुप्तचर विभागास असते, पण आपल्या पंतप्रधानांच्या दौऱयात अडथळे येऊ शकतात याची माहिती नसावी हे न पटणारे आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पंतप्रधान भटिंडा विमानतळावरून हेलिकॉप्टरने जाणार होते. खराब हवामानामुळे त्यांनी मोटारीने जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास 125 किलोमीटरचा होता. आपले पंतप्रधान इतका लांबचा प्रवास अचानक कसा करू शकतात? असा सवाल या लेखात केला आहे.
‘एसपीजी’ने त्यांना या प्रवासाची परवानगी दिली कशी? रस्त्याने जायचे हा निर्णय अचानक घेतला व त्या गोपनीय निर्णयाची माहिती इतर कुणाला असण्याची शक्यता नसावी. तरीही रस्त्यात आंदोलक होते व त्यामुळे पंतप्रधानांना माघारी जावे लागले असे सांगण्यात आले, ‘‘पण मी जिवंत पोहोचू शकलो असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा’’ अशा भावना जाता जाता पंतप्रधानांनी व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी हे इतके अस्वस्थ कधीच पाहिले नव्हते. पंतप्रधानांना आपल्या सुरक्षेची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. तशी काळजी देशवासीयांनाही वाटत आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत हे या निमित्ताने देवळांत घंटा वाजवून राजकीय जागरण करणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. पंजाबात वा अन्य राज्यांत भाजपची सरकारे नाहीत म्हणून पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेबाबत त्रुटी राहण्याचा प्रश्न उद्भवू नये. केंद्रातील सुरक्षा व्यवस्था ही यंत्रणा राबवत असते. महाराष्ट्र, प. बंगालातील अनेक भाजप नेत्यांना केंद्र सरकारने सीआयएसएफची विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. ते केंद्र सरकार पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत इतके गाफील राहील असे वाटत नाही. पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग अशा अनेकांना सार्वजनिकरीत्या जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागले. प्रतापगडावर आलेल्या पंडित नेहरूंना तर मऱ्हाटी जनतेने समोर येऊन काळे झेंडे दाखवले. इंदिरा गांधींवर दगड मारले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही 2012 मध्ये ते त्यांच्या पत्नीसह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेले होते त्या वेळी निदर्शकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तसा एक व्हिडीओच आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकपाल विधेयकाच्या मुद्दय़ावरून त्यांच्यासमोर तेथे घोषणाबाजी होताना, काळे झेंडे दाखविले जाताना या व्हिडीओमध्ये दिसते. त्या घटनेची तुलना आताच्या पंतप्रधान मोदी यांच्याबाबत पंजाबमध्ये घडलेल्या घटनेशी करणाऱ्या आणि त्यावरून विविध मते व्यक्त करणाऱ्या पोस्टही व्यक्त होत आहेत, असं देखील सामनात म्हटलं आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?