
पिंपरी चिंचवड, 6 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेला आहे. तरीही अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. यावेळी शिंदे सरकारने सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयावरुनही पवारांनी निशाणा साधला. नगराध्यक्षच नाही तर मुख्यमंत्री पण जनतेतून निवडा, असं आव्हान अजित पवारांनी सरकारला केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्यांचा मेळावा अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या मेळाव्यात मी नावं घेतलेल्यांमध्ये समावेश नसला तरी तुम्हाला तिकिट मिळू शकते, अशी फिरकी अजित पवार यांनी घेतल्याने इच्छूक कार्यकर्ते गॅसवर आहेत. पक्ष केंद्रस्थानी ठेवून मतदारांपर्यंत पोहचा. कोरोना कमी झाला असला तरी स्वाईन फ्लू वाढतोय, तेव्हा लोकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. यावेळी मावळातील अत्याचाराची घटना अंगावर काटा आणणारी आहे, असल्या नराधमांना आठ दिवसाच्या आत फाशी दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना टोमणा
यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हल्ला केला. पवार म्हणाले, की राज्यात सध्या एकट्याचेच मंत्रीमंडळ आहे. उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस हे बिन खात्याचे मंत्री आहेत, असा टोलाही पवारांनी लगावला. राज्यात आता सचिवांना मंत्र्यांचे अधिकार दिलेत, हे काय चाललंय? तीनचा प्रभाग चार करून मनपांच्या जागाच कमी करून टाकल्या, हा कुठला कारभार? तुम्ही तर लोकशाहीचा मुडदा पाडला. आता कायतर म्हणे लोकांमधून नगराध्यक्ष, एवढाच लोकशाहीचा पुळका असेल तर मग महापौर, मुख्यमंत्री पण लोकांमधून निवडून येऊ द्या, होऊन जाऊद्या, बघू मग, असं आव्हान अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं आहे. लक्षात ठेवा जनता हे सगळं बघतेय, तुमची सत्ता कधी उलथवून टाकतील कळणार पण नाही. मग तुमचा अधिकार पण चीफ सेक्रेटरीला देऊन टाका आणि घरी बसा. तुमच्या मनात नेमकी काय शंका हे लोकांना कळू द्या, तुम्ही मंत्रिमंडळविस्तार करायला का घाबरता ते, असंही पवार म्हणाले.
लोकांनी घरीच बसायचं का? : पवार
डिझेल, पेट्रोल आणि सीएनजीचे भाव जवळपास सारखेच करुन काय मिळवलं? आता काय लोकांनी घरीच बसायचं का? हा कारभार लोकांना परवडणारा नाही. सत्ताधाऱ्यांवर मतदारांचा अंकुश हा राहिलाच पाहिजे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा टोलाही पवारांनी लगावला. लक्षात ठेवा फुटलेले पुन्हा निवडून येत नाही, आठवा भुजबळ, राणेंबरोबर फुटलेले आमदार आता कुठे आहेत? वार्ड रचना कशी राहिल, हे आत्ताच काही सांगता येणार नाही. कारण, कोणी कोर्टात गेलं तर निर्णय पुन्हा फिरुही शकतो. त्यामुळे गाफिल अजिबात राहू नका, कधीही मनपा निवडणुका लागू शकतात, आत्तापासूनच तयार रहा.