पुणे – स्वच्छ भारत/महाराष्ट्र अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना आज आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस रक्कमेचा धनादेश सुपुर्द करुन गौरविण्यात आले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय, स्वच्छ भारत अभियान कक्षाचे उप आयुक्त संदीप खोत, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सहभाग घेतला आहे. स्वच्छ भारत / महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धा (स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज) आयोजित करण्यात आली होती. स्वच्छता मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे हा या स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे गठीत समितीने मुल्यमापन करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला होता. यामध्ये सुजीत बाबर यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर डॉ.डी.वाय.पाटील इनस्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग च्या मॅनेजमेंट अँड रिसर्च, आकुर्डी मधील शुभम चांदगुडे आणि टीमला द्वितिय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाला तृतीय क्रमांक मिळाला.विजेत्यांना अनुक्रमे ४१ हजार, ३१ हजार आणि २१ हजार रुपयांचा धनादेश आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
शासकीय कार्यालयांतर्गत चालणाऱ्या सेवा, योजना, माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सॉफ्टवेअर अँप्लिकेशन सुजित बाबर, ट्रान्सफिगर टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड यांनी विकसित केले. शुभम चांदगुडे आणि टीमने द वेस्ट गोल्ड माइन हा प्रोजेक्ट सादर केला. यामध्ये निर्मित कचऱ्यापासून कम्पोस्ट खताची निर्मिती करण्यासंदर्भात संशोधनात्मक मांडणी केली. निरुपमा राजीवन यांच्या टीमने डिजीटल सोल्युशन टु चेक दी ओव्हर फ्लो ऑफ सेप्टीक टँक ऍन्ड सिव्हर लाईन्स हा प्रोजेक्ट सादर केला.
महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल आयुक्त राजेश पाटील यांनी विजेत्यांचे कौतुक केले. तसेच भविष्यात देखील या विषयावर अधिक संधोधन करुन काम करत रहावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
Read Time:4 Minute, 12 Second