मुंबई, 12 एप्रिल : ‘शेवटी ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झालं. स्वत: च्या राजकारणाच्या हवाशापोटी पीडित मुलीचे आयुष्य उद्धवस्त केलं आहे. मंदीत संधी साधणारे हे लोक आहे’ अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. तसंच, रघुनाथ कुचिक प्रकरणातील धागेदोरे तपासून कडक कारवाई केली जाईल, असंही चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
महिला अत्याचाराच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर एकदाही टीकेची संधी न सोडणाऱ्या चित्रा वाघ रघुनाथ कुचिक प्रकरणात अडचणीत सापडल्या आहेत. पीडितेनं आज चित्रा वाघ यांनीच हे प्रकरण घडवून आणले असा खुलासा केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले आहे.
शेवटी दूध का दूध पाणी झालं. काही लोकं स्त्री सुरक्षेतचा टाहो फोडत असतात. पण स्वत: च्या राजकारणाच्या हवाशापोटी पीडित मुलीचे आयुष्य उद्धवस्त केलं आहे. मंदीत संधी साधणारे हे लोक आहे, यांच्याबद्दल पीडितेनं खुलासा केला आहे’ असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला.
‘रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडित मुलीने याबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये पीडित मुलीने वैद्यकीय तपासणी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने पीडितेची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली. तिला जी मदत लागेल ती देण्यात आली’ असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
‘राज्य महिला आयोगाच्या वतीने पीडितेला पूर्ण न्याय दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी त्या पीडितेचा मला फोन करून बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिची लवकरच भेट घेणार आहे. पण, या प्रकरणात काही धागेदोरे आहे, कुठल्या व्यक्तीला बदनाम करत आहे, याची माहिती घेऊन कडक कारवाई केली जाईल असंही रुपाली चाकणकर यांनी ठणकावून सांगितलं.
तसंच, ‘घाणेरडे राजकारण करत वैयक्तिक फायद्यासाठी एका मुलीच आयुष्य चित्रा वाघ यांनी उध्वस्त केले अशी टीकाही रूपाली चाकणकर यांनी केली.