आर्टिकल: म्हणून आमचे महामार्ग मृत्यूमार्ग बनलेत – महेश म्हात्रे
Views: 85
0 0

Share with:


Read Time:5 Minute, 31 Second

मोटार कारमधे मागच्या सीटवर बसलेल्यांसाठीही सीटबेल्ट लावण्याची सक्ती करण्याचा कायदा लवकरच केला जाणार”
: नितीन गडकरी

कायदा हा केवळ फायदा घेण्यासाठीच असतो, पाळण्यासाठी नसतो, असे मानणाऱ्या अशिक्षित आणि सुशिक्षित लोकांवर सजग आणि कार्यतत्पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या नवीन कायद्याचा काय परिणाम होणार?
भारतात माणसाच्या आयुष्याला किंमत नाही, कारण बहुसंख्य भारतीयांकडून कायद्यांची “किंमत” केली जाते…किंमत मोजली जाते.
म्हणून आमचे महामार्ग मृत्यूमार्ग बनलेत… तुम्ही रस्त्यावर चालत असा किंवा गाडीत निवांत बसा…
सतत लेन बदलणारे बेदरकार ट्रक ड्रायव्हर, सुसाट वेगात अलिशान गाड्या हाकणारे बेभान उच्चभ्रू , रस्त्यावर कसेही, कधीही थांबणारे अनपढ-अडाणी अशा चित्रविचित्र रुपात मृत्यू तुमच्यावर कधीही झडप घालू शकतो…
त्यात भरीस भर म्हणजे आपल्याकडील रस्ते. रस्ता मग छोट्या गावचा असो किंवा महानगरांना जोडणारा महामार्ग या संपूर्ण रस्ते बांधणीमध्ये जे तंत्रशुद्ध काम व्हायला पाहिजे, ते ते फार कमी प्रमाणात होताना दिसते. कारण भ्रष्टाचार हा या रस्ते बांधणीचा आधार आहे. शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची साधारणत: जास्त चर्चा होते. पण शासकीय अहवालानुसार सर्वात जास्त अपघात ग्रामीण भागातील रस्त्यांवर होतात. जे रस्ते आमदार/ खासदार विकास निधीतून जवळच्या कार्यकर्त्यांत अक्षरश खिरापतीसारखे वाटलेले असतात. मग हेच ठेकेदार राजकारणात येतात, समाजसेवक बनून लोकांना भुलवतात… लोकही आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्या ऐवजी खड्ड्यातून वाट काढत पुढे जातात…

जगातील वाहन संख्येच्या तुलनेत भारतात फक्त एक टक्का वाहने आहेत, परंतु जगातील एकूण अपघातांपैकी 11 टक्के अपघात भारतात होतात. गेल्या वर्षी आपल्या देशात चार लाख २२ हजार अपघात झाले. त्यात जवळपास पावणेदोन लाख लोक मेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल यातील १४ टक्के अपघात केवळ सीट बेल्ट न लावल्यामुळे झाले होते. म्हणजे एका वर्षात भारतात जवळपास वीस-बावीस हजार लोक केवळ वाहन विषयक अज्ञानापोटी मेले. मी जेव्हा कधी मुंबईतील टॅक्सी, ओला, उबर चालक केवळ औपचारिकता म्हणून नावापुरताच सीटबेल्ट गळ्यात घालताना पाहतो, तेव्हा पोटात गोळा येतो…
आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा पार रस पिळून काढण्यात लोकांना आनंद मिळतो. अर्थात शासन नामक लोकनियुक्त संस्था तरी कशी वेगळी असणार?
देशात भंंगार, जुन्या गाड्यांमध्ये प्रवास केल्यामुळे जवळपास ४१ टक्के अपघात झाले होते. हे गतवर्षीच्या “राष्ट्रीय क्राईम रिपोर्ट” या शासकीय अहवालात म्हटले आहे… अति वेगात गाडी चालवून जेथे फाटे फुटतात, अशा क्रॉसिंगच्या ठिकाणी जास्तीत जास्त अपघात होतात हे सगळेजण जाणतात. ते रोखण्यासाठी कायदे सुद्धा आहेत, परंतु लोकांचे मृत्यूसत्र कायम सुरूच आहे. रस्ते अपघातांमध्ये मरणाऱ्यांच्यात महाराष्ट्रातील लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. गेल्या वर्षी २४ हजार ७११ लोक रस्ते अपघातात मरण पावले. तेवढेच जखमी झाले, त्यापैकी काही अपंग झाले. असंख्य घरातील हजारो कर्ते पुरुष, कर्तबगार महिला, डोळ्यात भविष्याची स्वप्न पाहणारे तरुण-तरुणी आणि जीवनाच्या आनंदाचा साधा स्पर्शही न झालेले अबोध बालके या अपघातात मरण पावणे हे सरकारचे , समग्र समाजाचे अपयश आहे.
अशा वेळेस सुधारककार गोपाळ गणेश आगरकर आठवतात आणि त्यांचे बोलही आठवतात “राजकीय सुधारणांच्या आधी सामाजिक सुधारणा करा” हा त्यांचा आग्रह आजही तेवढाच उपयुक्त आहे…पण लक्षात घेताय कोण?
सतत हक्क मागणाऱ्यांना… कर्तव्य शिकवणार कोण?

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?