#All_is_वेल…
पावसाळ्यात पुन्हा ती उगवली
कोवळेपणातच झाडाकडे धावली
मग सरळ वाकडं झाडही थोडसं झुकलं
बहरणार वेल माझ्यावर विचाराने खुदकन हसलं
वेल बिलगली बुंध्यावर मग पसरली फांद्यावर
कळण्याआधीच काही झाडाला
वेल पोहचली शिरावर
मग शिरावरूनच स्वर्ग ती गाठू लागली
झाडा भोवती वेटोळे टाकू लागली
वेलीची भूक वाढली एव्हढी….
ती झाडाचीच सावली खाऊ लागली
आता झाडाचं खोडही कुजू लागलं
वेढा वेलीचा त्याला सोडवता येईना.
वेलीच्या ओझ्याखाली दबल्या फांद्या
फळा-फुलांनाही लगडता येईना
वृक्ष कसा रुक्ष झाला म्हणत,
लोक झाडाची लाज काढू लागले
झाड होतं गावाचं, तरीही त्याला ओरबाडू लागले
वेलीनं तर गिळलचं होतं अस्तित्व झाडाचं
मग लोकही झाडालाच झुडूप म्हणू लागले
झाड मात्र शांत होतं
आपल्याच धुंदीत डोलत होतं
वेलीच्या गुंता वाढला तरीही
तिच्याच खाली बहरत होतं
तेवढ्यात पावसाळा संपला
अन वेलीचा बहरही सरला
वेल होईल वाटलं झाड
मात्र झाडाचा हा भ्रमही तुटला
वेल गळून पडताच, झाड उघडं पडलं
नातं त्याचं खोडा सोबत पण मन वेलीवर जडलं
फांद्या फळे तर नसतातच त्याचे कधी
पानगळही नशिबी त्याच्या कायम आहे
जुनं झालं की तोडून टाकतात,
झाड राहतं मजबूत हा फक्त वहेम आहे
#वेल एकदाच घेते जन्म
अन कायम झाडाचीच होते
कितीही पावसाळे आले तिच्यासाठी
तरी ती झाडावरच बहरते
#झाडही जेव्हा जन्म घेतं
त्याला आधार तरी कोण देतं..!!!
फक्त वेलीच्या प्रेमासाठीचं तर
झाड आयुष्यभर उभं राहतं…!!!
–गोविंद अ. वाकडे