लम्पी चर्म रोग या गाई-म्हशींना होणा-या विषाणूजन्य रोगाची साथ सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, आंध्र प्रदेश इ. अनेक राज्यात पसरली आहे.
. राज्यात सर्वप्रथम दि. ०४.०८.२०२२ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पी चर्म सदृष्य रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले.
• तद्नंतर राज्यामध्ये जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम व नाशिक या १९ जिल्ह्यांमध्ये दि.१०.०९.२०२२ अखेर एकूण २८० गावांमध्ये लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. जळगाव जिल्ह्यातील १३, अहमदनगर जिल्ह्यातील १३ अकोला जिल्ह्यात १, पुणे जिल्ह्यात ३ बुलडाणा जिल्ह्यात ३ व अमरावती जिल्ह्यात ३ असे एकूण ३६ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत सुरूवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे महाराष्ट्रातील लम्पी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आले आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील १३९८ गावातील एकूण ४,०७,७८१ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे व पुढील लसीकरण सुरू आहे. बाधित गावांतील एकूण २.१०१ बाधित पशुधनापैकी एकूण १२४५ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन मंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशुसंवर्धन आयुक्त श्री. सचिन्द्र प्रताप सिंह (भाप्रसे) यांचेसमवेत दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी जळगाव, अकोला व औरंगाबाद जिल्ह्यातील लंपीचर्म रोगाने बाधित गावांचा दौरा करून पशुपालक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेवून सद्य स्थितीचा आढावा घेतला. दौऱ्या दरम्यान त्यांनी पशुपालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपचार, रोग नियंत्रणासाठी विभागाची यंत्रणा करीत असलेल्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेतला व पशुसंवर्धन विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. दौ-याच्या अखेरीस त्यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन विभागाचे पूर्ण राज्यातील प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांची आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, सुनील केंद्रेकर (भाप्रसे) विभागीय आयुक्त हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री, महसूल व पशुसंवर्धन यांनी, 1. “राज्यात लंपी चर्म रोगाचा झपाट्याने प्रसार होतो आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी
मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी. जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही (सोशल मिडियाचाही) वापर करावा. 2. लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या लस व औषधींची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून करावी.
3. लंपी चर्म आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम
घ्यावी. त्यासाठी मानधन तत्वावर त्यांच्या सेवा घ्याव्यात तसेच पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत विभागाने शासनास प्रस्ताव सादर करावा. 4. हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि जिल्हा परिषद सेस
यातून औषधे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. 5. आपल्या या प्रयत्नांबरोबरच दि. ०८.०९.२०२२ शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिसूचना प्रसिद्ध करून त्याअन्वये प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ (२००९ चा २७) याची कलमे (६), (७), (११), (२२) व (१३) या द्वयारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, संपूर्ण महाराष्ट्र राज्य लंपी चर्म रोगाच्या बाबतीत “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार गो व म्हैस प्रजातीची नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
.तसेच गो व म्हैस प्रजातीचा बाजार भरविणे, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शने इ. बाबींस मनाई करण्यात आली आहे. 6. महाराष्ट्रातील लम्पी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी राखण्यामध्ये आतापर्यंत यश मिळविल्याबद्दल मंत्रीमहोदयांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. परंतु अधिक गतीने लसीकरण करावे व रोग पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.
मा. कृषी मंत्री मा. श्री. अब्दुल सत्तार यांनी जनावरांसाठी आवश्यक तपासणी प्रयोगशाळा जिल्हास्तरावर अद्यावत कराव्यात यासाठी पशु संवर्धन विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली.
पशुसंवर्धन आयुक्त मा. श्री. सचिन्द्र प्रताप सिंह (भाप्रसे) यांनी लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात दि. ९.०९.२०२२ पर्यंत ७०,१८१ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये ४५०६३, पंजाब मध्ये १६८६६, गुजरात मध्ये ५३४४ व हरियाना मध्ये १८१० जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांमध्ये अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही, परंतु आवश्यक खबरदारी घ्यावी, असे पशुसंवर्धन आयुक्त मा. श्री. सचिन्द्र प्रताप सिंह (भाप्रसे) यांनी पशुपालकांना आवाहन केले आहे. सन २०२०-२१ मध्ये राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव आढळून आलेला होता परंतू मरतूक अत्यल्प होती. तसेच २०२१-२२ मध्ये १० जिल्ह्यांत लम्पी स्कीन रोग प्रादुर्भाव आढळून आलेला होता परंतू मरतूक झाली नव्हती. लम्पी चर्म रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो आणि या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले. तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम ४ (१) नुसार पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सदरची माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे, अशी माहिती दिली.
आयुक्त पशुसंवर्धन, मा. श्री. सचिंद्र प्रताप सिंह (भाप्रसे) यांनी पुढे पुनरुच्चार केला की, लंपी चर्म रोगाने (एलएसडी) बाधित गावांमध्ये केलेल्या व्यापक दौऱ्यांमध्ये असे निदर्शनास आले आहे की, खासगी पशुवैद्य लंपी चर्म रोगाने (एलएसडी) बाधित पशुधनासाठी महागडी प्रतिजैविके आणि इतर औषधे लिहून देत आहेत, तर एलएसडी निर्धारित उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचीकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. सर्व पशुपालकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या बाधित पशुधनासाठी त्यांच्या दारात मोफत उपचार घ्यावेत. याबाबत काही तक्रार असल्यास, विभागाच्या जिल्हा उपआयुक्त किंवा खात्याच्या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. तसेच लंपी चर्म रोगाची लक्षणे दिसल्यास, जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने / पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन उपचार करून घ्यावे.