३० सप्टेंबर १९९३ ही तारीख आणि पहाटेचे ४ वाजून २ मिनिटांची वेळ मी कधीच विसरू शकणार नाही, पत्रकारितेचे शिक्षण घेऊन २९ सप्टेंबरला मी लातूरच्या *दैनिक एकमत* मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झालो होतो,माझ्या पत्रकारितेचा तो श्रीगणेशा होता.तो दिवस गणेश विसर्जनाचा होता,रात्री १२ पर्यंत मिरवणूक पाहिली आणि रूमवर आलो,पहाटे आमची मित्रमंडळी आरडाओरडा करून जागी झाली,काही कळण्याच्या आत आम्ही जिना उतरून रस्त्यावर आलो.त्यावेळी मी लातूरच्या शिवाजी चौकात राहत होतो. लातूरला यापूर्वी अनेक भूकंपाचे धक्के बसले होते,याची आठवण झाली आणि मग किल्लारी गाठण्याचा आम्ही निर्णय घेतला. रुमवर गेलो कपडे घातले,खिश्यात जेमतेम १०० रुपये,सकाळची बस शिवाजी चौकात गाठली आणि पहाटे ५ वाजता मी, राजेंद्र सूर्यवंशी, सुज्ञान गायकवाड व शिवाजी कांबळे किल्लारीत पोहोचलो.
सूर्य दर्शन अजून व्हायचे होते.किल्लारीचे दृश्य अत्यंत भयावह होते, गाव पूर्ण उध्वस्त झाले होते,मातीच्या गढी जमीनदोस्त झाल्या होत्या,माणसे गाढली गेली होती, सर्वत्र किंकाळ्या ऐकू येत होत्या, वाचवा-वाचवा हे शब्द चोहोबाजूंनी ऐकू येत होते. क्षणाचाही विचार न करता आम्ही लोकांना वाचविण्यासाठी धावलो. एक चादर घेतली व जखमींना त्यावर झोपऊन आम्ही चौघे त्यांना उचलून सुरक्षित ठिकाणी हलवायचो.सकाळी १० पर्यंत आम्ही किमान ५० लोकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरलो. तो पर्यंत किल्लारीला येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला होता, बचाव कार्यात अडचणी येऊ लागल्या.त्यावेळचे जिल्हाधिकारी प्रविनसिह परदेशी यांनी परिस्थिती योग्यरीत्या हाताळली. आमचे संपादक राजा माने किल्लारीत पोहोचले होते, त्यांनी मला विचारले की, तू किल्लारीत किती वाजता आलास ? मी म्हणालो, मी ५ वाजता पोहोचलो, ते लगेच म्हणाले, याला म्हणतात पत्रकार, आजची बातमी तू लिही, जे पाहिलेस ते पूर्ण लिही. दुपारी २ पर्यंत आम्ही किल्लारीत होतो.
आता बातमी लिहायची होती, लातूरला जायचे होते, वाहन मिळेना, एक एसटी बस आली पण खचाखच भरलेली,आम्ही त्या बसच्या टपावर चढलो ( अर्थात विनाटिकीत) व लातूर गाठले, तोपर्यंत चहाही पिला नव्हता,लातूर कडकडीत बंद होते,आम्ही ऑफिस गाठले आणि हातात पेन घेतला आणि बातमी लिहायला सुरुवात केली.माझ्या पत्रकारितेची ती सुरुवात. त्यादिवशी आम्ही रात्री ४ पर्यंत ऑफिस मध्ये होतो,२४ तास कसे उलटून गेले हे कळलेच नाही. छापलेला पेपर घेवून आम्ही पायी रूमवर पोहोचलो, अंथरून घेतले व शिवाजी चौकातल्या हॉटेल ब्रिजवासी च्या समोर रस्त्यावर झोपी गेलो, रस्त्यावर झोपणे व सकाळी रिपोर्टिंग साठी एखादे गाव गाठणे हा दिनक्रम महिनाभर चालू होता.या काळात राजा माने सरांनी आम्हाला खूप संधी दिली, भूकंपग्रस्त अनेक गावात जाऊन वार्तांकन करता आले. अनेक चांगल्या बातम्या त्याकाळी मी लिहिल्या, याच काळात मी प्रिंटींग मशीनही चालवायला शिकलो.काही काळानंतर मी एकमत सोडून दैनिक लोकमत मध्ये रुजू झालो… पण किल्लारी दिनांक ३० सप्टेंबर ही डेटलाईन आजही विसरू शकत नाही
दयानंद कांबळे.