अमरावती : अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीतील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकून निषेध नोंदवल्याचा आरोप झाला होता. बुधवारी दुपारी आष्टीकरांसमोर महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि पुतळा का हटवला, याचा जाब विचारत त्यांच्या अंगावर थेट शाई फेकली होती. हा प्रकार कॅमेरात कैद झाला होता.
आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या जवळपास दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय बोबडे, विनोद येवतीकर, सुरज मिश्रा, संदीप गुलहाने, महेश मूलचंदानी, अजय मोरया, कमलकिशोर मालानी, प्रीती देशपांडे, साक्षी उमक आणि मीरा कोलटेके यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. यापैकी पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तीन महिलांनी शाई फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच एका महिलेने त्यांना घेरले अन् बाटली भरून आणलेली शाई आयुक्तांच्या अंगावर ओतली. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने धाव घेऊन आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या सुरक्षा रक्षकाने आयुक्तांना कवटाळून धरत या महिलांपासून त्यांचा बचाव केला. त्यानंतर या महिला पळून गेल्या. जाताना या महिलांनी जय भवानी, जय शिवाजीचे नारे दिले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राजापेठ उड्डाणपुलाखाली असलेल्या अंडर बायपास मध्ये पाणी साचत असल्याने ते पाहणी करण्यासाठी मला एका कंत्राटदाराचे 9 वेळा फोन आले. तसेच आमदार येत आहेत, असा मला निरोप देण्यात आला. मी जेव्हा त्या भागाची पाहणी करायला गेलो, तेव्हा माझ्या अंगावर दोन महिला धावून आल्या आणि त्यांनी शाईफेक करून मला धक्काबुकी केली, असा आरोप आयुक्त प्रविण आष्टीकर यांनी केला आहे. हल्ला करणाऱ्या चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असल्याची माहितीही आष्टीकर यांनी दिली आहे.