अमरावती : अमरावतीचे महापालिका आयक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही महिलांनी अचानक येत आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली.
अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या हटवल्यावरुन राजकारण तापलं आहे. 12 डिसेंबरला युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण त्यानंतर 16 डिसेंबरला तो पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती.
पुतळा का हटवला याचा जाब विचारत काही महिलांनी आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाई फेकली. पालिकेचे सुरक्षा रक्षक तात्काळ आष्टीकर यांच्या बचावासाठी धावले आणि प्रसंगावधान दाखवून शाईफेक करणाऱ्या महिलांना कार्यालयाबाहेर काढलं. पण यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण होतं.
पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिका आवारात सुरक्षा रक्षकासोबत पाहणी करत होते. त्यावेळी तिथे अचानक आलेल्या महिलांनी घोषणाबाजी करत आयुक्तांवर शाई फेकली.