पुणे – महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणार्या श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्यावर सीआयडीच्या अहवालानुसार त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती तथा समविचारी संघटना यांच्या वतीने सायंकाळी 5 वाजता ‘पुणे येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, बालगंधर्व रंगमंदिराजवळ डेक्कन येथे तसेच तुळजापूर येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ करण्यात आले.
श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर हे शासकीय नियंत्रणात असूनही तेथे वर्ष 1991 ते वर्ष 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात 8 कोटी 45 लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार ठेकेदार आणि उच्च अन् कनिष्ठ पदस्थ शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने झाला. या विषयी संभाजीनगर उच्च न्यायालयात हिंदु जनजागृती समितीने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे हा अहवाल 20 सप्टेंबर 2017 या दिवशी सीआयडीने गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांना मंत्रालयात सादर केला; मात्र पाच वर्षे होत आली, तरी दोषींवर कारवाई तर दूरच; साधा अहवालही विधीमंडळात वा बाहेर सार्वजनिक करण्यात आलेला नाही. असे त्यात काय आहे की, सरकार अहवाल उघड करण्यास घाबरत आहे ? एखाद्याने मास्क घातला नाही, तरी शासनाने 200 ते 500 रुपयांचा दंड सामान्य जनतेकडून वसूल केलेला आहे. साधा नियम मोडणार्यांवर ज्या तत्परतेने कारवाई होते तितकी 8 कोटी 45 लाख रुपयांचा भ्रष्टाचार करणार्यांवर घोटाळा प्रारंभ होऊन 31 वर्षे झाली तरी कारवाई का होत नाही ? या घोटाळ्यातील एक आरोपी मृत पावला आहे. शासन बाकीचे आरोपी मृत होण्याची वाट पाहत आहे कि दोषींना पाठिशी घालण्याचे ठरवले आहे ? हे सरकारने एकदाचे घोषित करावे; मात्र जोपर्यंत या सर्व दोषींवर कारवाई होत नाही, तसेच त्यांच्याकडून अपहार झालेली रक्कम चक्रवाढ व्याजासह वसूल होत नाही, तोपर्यंत श्री तुळजाभवानी मातेचे भक्त तथा हिंदु जनजागृती समिती हे आंदोलन चालूच ठेवणार आहे. आज पुणे आणि तुळजापूर येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलन राज्यातील इतर जिल्ह्यांतही करण्यात येणार आहे, अशी चेतावणी या वेळी आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आली.
या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद आदी संघटना, तसेच तुळजापूर देवस्थानचे पुजारी प्रताप कुलकर्णी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री.मोहन डोंगरे,श्री.निलेश निढाळकर, अधिवक्ता सौ.सीमा साळुंखे, सनातन संस्थेचे श्री.चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. 130 हुन अधिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.